वसईतील ऐतिहासिक स्थळांचे नोंदणीकरण

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार :  किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत वसईतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर वसई गाव परिसरात शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळा उजेडात आणली गेली.  या संस्थेतर्फे इतिहास संकलन मोहीमेअंतर्गत वसईतील ऐतिहासिक स्थळांचे नोंदणीकरण सुरू आहे.  त्यानुसार श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या आवारातील अप्रसिद्ध, अप्रकाशित शिलालेखाचा प्रथमच वेध घेण्यात आला. यावेळी हे शिल्प  उजेडात आले आहे.

किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक व प्रमुख डॉ. श्रीदत्त राऊत यांनी माहिती दिली की, वसईत पुरातत्व विभागाच्या उदासीन धोरणामुळे शेकडो शिलालेख, पुरातन वास्तू संग्रहित न झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.  अशाच प्रकारचा हा शिलालेख अनेक वर्षांत ऊन, पाऊस, वारा या नैसर्गिक प्रभावात शेवाळ, माती, चिखल साचून सदर पूर्णपणे शिळा अंतिम घटकेत नामशेष होण्याच्या मार्गावर होती.  या शिलालेखावर असलेले मंगलकलश, कोरीव शिवलिंग, गद्धेगाळ प्रतिमा (अस्पष्ट नामशेष), ६ ओळींचा शिलालेख, असा तपशील संकलित करण्यात आला. किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत सन २०१०-११ साली अशाच प्रकारचा शिलालेख किरवली गावातसुद्धा शोधून काढला होता.

राऊत यांनी या शिलालेखाबद्दल माहिती देताना सांगितले की, दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौलपर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्षे राज्य करीत होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिल्ह्यचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा समावेश होतो. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव,  मल्लीजुर्न, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू व अवशेष वसई प्रांतात विखुरलेल्या आहेत.