वसई किल्ल्यात छायाचित्रे काढणाऱ्या पर्यटकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार

वसई : वसई किल्लय़ातील छायाचित्र काढणाऱ्या पर्यटकांकडून पुरातत्त्व खात्याचेच कर्मचारी बेकायदा पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी गणवेशाशिवाय भाडे आकारत असून त्याची पावतीही देत नसल्याच्या तक्रारी पर्यटकांनी केल्या आहेत.

वसईच्या किल्ल्यात गर्दुल्ले, मद्यपी, प्रेमी युगुलांचे चाळे चालत असल्याचे प्रकार ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी उघडकीस आणले. सध्या किल्ल्यातील मद्यपी आणि प्रेमीयुगुलांवर पुरातत्त्व खात्याची करडी नजर असल्याने अशा घटनांवर आळा बसला आहे, तसेच प्री-वेडिंग शूट वसई किल्ल्यात होऊ नये यासाठी अनेक इतिहासप्रेमींनी आवाज उठवला होता. त्यानंतर किल्ल्यातील प्री-वेडिंग शूटचे प्रमाण कमी झाले असताना सध्या पर्यटकांकडून छायाचित्रे काढण्यासाठी भाडे आकारात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे भाडे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी गणवेशाशिवाय आकारात असून त्याची योग्य ती पावतीही देत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या शंकर बने यांनी केला आहे.

पुरातत्त्व विभाग सध्या दृक्श्राव्य चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) तसेच ट्रायपॉडसह चित्रीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी ५० हजार शुल्क तर १० हजार अनामत रक्कम आकारते, परंतु ट्रायपॉडशिवाय छायाचित्रण केल्यास त्यास कोणतेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही. पर्यटकास ट्रायपॉड न वापरता छायाचित्र काढायचे असल्यास त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारावे लागत नाही. व्यावसायिक छायाचित्रणाची परवानगी शीव येथील पुरातत्त्व विभागाच्या मुख्य कार्यालयातून घ्यावी लागते आणि तिथेच योग्य तो शुल्क भरावा लागत असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या वसई उपविभाग अधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले. आमचे कर्मचारी अशा प्रकारची कोणतीही लूट करत नसल्याचे सांगत शिंदे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.