तृप्ती राणे 

चिंचोटी धबधबा

पाऊस पडायला सुरुवात झाली की डोंगरदऱ्या त्यावरून ओसंडून वाहणारे लहान मोठे शुभ्र धबधबे भटक्या पायांना खुणावू लागतात. पाय आपोआप डोंगररांगा, धबधब्याकडे वळू लागतात. दर शनिवार-रविवार फिरण्यासाठी नवनवीन जागा मंडळी शोधू लागतात. काहींना नदी, ओढय़ांचे वेड, काहींना जंगलसफारीचे वेड, तर काहींना धबधब्याचे तुषार अंगावर झेलत चिंब होण्याचा आनंद लुटायचा असतो. पण हे सगळे एकाच जागी मिळणे तसे कठीण. पण मी जर म्हटलं अशी एक जागा आपल्या मुंबईच्या जवळच आहे तर.. मुंबईच्या जवळ वसई पूर्व भागातील चिंचोटी गावात हे सारे निसर्गसौंदर्य तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येते. एकाच ठिकाणी तुम्हाला लहान-मोठे ओहोळ,  जंगल, पशुपक्षी आणि हो इथल्या जंगलात असलेला महाकाय प्रपातासारखा ओसंडून वाहणारा धबधबा यांचे दर्शन घेता येते. मुंबईपासून जवळ असल्याने चिंचोटीचा धबधबा अनेकांच्या पसंतीचे ठिकाण झाले आहे.

चिंचोटी गावातून ओढय़ाच्या कडेकडेने जाणाऱ्या पायवाटेने तास-दीड तासात या धबधब्यापाशी पोहचता येते. पायवाट तरी कसली.. दगड-धोंडय़ांची. कुठे चढ-उतार, कुठे निसरडे वळण. कुठे अरुंद वाटा.. जाताना मार्गात २० ते २५ छोटे-मोठे ओहोळ ओलांडावे लागतात. एरवी या ओहोळामध्ये फार पाणी नसते, मात्र कधीतरी मुसळधार पावसाने डोंगरात वाहणाऱ्या नाल्यांमध्ये, ओढय़ांमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो आणि त्यातून चालणेही कठीण होऊन जाते. ही बाब मात्र आवर्जून तिथे जाणाऱ्या मंडळींनी लक्षात घेतली पाहिजे. ते जर का लक्षात घेतले तर हा धबधबा आणि इथले जंगल याची भटकंती म्हणजे सुखद अनुभव आहे.

नुकतेच या धबधब्यात खूप लोक अडकले म्हणून हा धबधबा पुन्हा खूप चर्चेत आला. अतिउत्साहात काहीजण धबधब्याच्या मध्यावर खेळ करत रमतात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालवतात. तेवढे जरा टाळले तर शहराच्या जवळ नैसर्गिक विविधता असणारा हा धबधबा फिरण्याचे छान ठिकाण आहे. धबधब्यापर्यंत पोहोचणारी वाट जंगलातूनच जात असल्याने आजूबाजूचे हिरवेकंच जंगल पाहत.. पशुपक्षी पाहत चालणे आल्हाददायकच वाटते. चालताना मनाला कसलाच क्षीण वाटत नाही. इथल्या जंगलात बऱ्याच वनौषधी पाहायला मिळतात, तसेच पाण्यात छोटे मासे, चिंबोरीही कधी कधी पाहायला मिळतात. तास-दीड तासांचा रोमांचक आणि काहीसा अवघड प्रवास केल्यावर धबधब्याचे जे विलोभनीय दर्शन होते ते मोहवणारे आहे.

प्रपातासारख्या कोसळणाऱ्या धबधब्यामुळे इथे नैसर्गिक डोह तयार झाला आहे. इथल्या डोहात पोहण्याची मजाही काही औरच. पण हे सगळे करताना स्वत:ची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची. धबधबा काहीसा आत असल्याने तिथे खाण्याची वगैरे सोय नाही. त्यामुळे जाताना स्वत:सोबत पाणी आणि खाण्याचे पदार्थ नेलेले उत्तम. इथे जाण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी फाटय़ावरून आत जाता येते. वसईवरूनही चिंचोटी गावात जायला बस किंवा रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. स्वत:ची गाडी असेल तर उत्तम. काहीशी सावधानता बाळगली तर चिंचोटीचा धबधबा भटकंतीसाठी उत्तम पर्याय आहे.

truptiar9@gmail.com