परवाच मला फोन आला मैत्रिणीचा. ती म्हणाली, ‘‘तुझा लेख वाचून मला झाडं लावायची स्फूर्ती मिळाली आहे. मला बागकाम आवडतं, पण कुठे, कशी आणि कोणती झाडं लावायची ते कळत नाही.’’ मी तिला विचारलं, ‘‘तुला बागकाम आवडतं, पण ते करता येतं का?’’ तेव्हा  ती म्हणाली, ‘‘बागकाम म्हणजे काय झाड लावायचं ना?’’ या संवादामुळे आताचा विषय लिहिणे मला भाग पडलं. प्रत्यक्ष काम करायला लागण्यापूर्वी आपल्या संकल्पना स्पष्ट असणं आवश्यक आहे.

‘गृहवाटिका’ आणि ‘बागकाम’ या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. उपमा द्यायची झाली तर, ‘गृहवाटिका’ म्हणजे वास्तुरचना आणि ‘बागकाम’ म्हणजे घरातली अनेक कामं. ‘गृहवाटिका’ या संकल्पनेत सर्जनशीलता, आयोजन आणि सजावट यावर जास्त भर येतो, तर बागकामात झाड लावणे आणि झाडांची निगा राखण्यासाठी करायच्या गोष्टींचा समावेश होतो.

गृहवाटिकेचा विचार करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. सर्वप्रथम कुंडय़ा ठेवण्यासाठी जागेची निवड आणि त्या जागेत किती कुंडय़ा मावतील याचा अंदाज. यासाठी कुंडय़ांचा आकार आणि रचना आपल्याला ठरवावी लागेल. समजा, खिडकीच्या एका ग्रिलमध्ये कुंडय़ा ठेवायच्या आहेत, तर सर्व कुंडय़ांचा आकार आणि साइझ सारखा असावा किंवा त्यात काही तरी आकारसंगती असावी, तर दिसायला त्या कुंडय़ा चांगल्या दिसतील.

आपण तरंगती कुंडीही (हँगिंग) वापरू शकतो. मात्र त्यासाठी योग्य जागा आपल्याला निवडायला हवी.

एखाद्या जागी एकच कुंडी ठेवायची असेल, तर कोणताही आकार आपण निवडू शकतो. अशा वेळी झाडांबरोबरच कुंडीचा आकार जास्तीत जास्त आकर्षित करणारा असावा.

गृहवाटिकेसाठी कुंडीमध्ये लावायच्या झाडांची निवड करताना कुंडय़ांवर किती वेळ सूर्यप्रकाश पडतो हा महत्त्वाचा घटक आहे. झाडांचे आपण फुलझाडे आणि शोभेची झाडे असं वर्गीकरण केलं, तर फुलझाडांना जास्त सूर्यप्रकाश लागतो. सर्वसाधारणपणे फुलझाडांना पाच तास सूर्यप्रकाश लागतो, तर शोभेच्या झाडांना अर्धा ते एक तास थेट सूर्यप्रकाश पुरतो. झाडांना लागणारी माती, पाणी आणि सूर्यप्रकाश याची सखोल माहिती पुढच्या लेखांमधून मिळेलच. थोडक्यात, योग्य जागी योग्य आणि सुंदर कुंडय़ा तसेच झाडे यांची रचना करून त्याचा उपयोग आपण गृहसजावटीसाठी करू शकतो.

‘बागकाम’ यात पुढील गोष्टींचा समावेश होतो. कुंडीत झाड लावणे, झाडांना पाणी घालणे, लागणाऱ्या उपकरणांची माहिती करून घेणे, योग्य वेळी झाडाची छाटणी करणे, झाड एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावणे, बिया किंवा फांदी किंवा कंद यापासून नवीन रोपे तयार करणे इत्यादी.

गृहवाटिका सुंदर दिसण्यासाठी आणि छान बहरण्यासाठी ‘गृहवाटिका’ आणि ‘बागकाम’ या दोन्ही संकल्पना अवगत असणे आवश्यक आहे.