मुंब्रा बाह्यवळण सुरू होताच अवजड वाहनांचा भार वाढला; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांचीही भर

मुंब्रा बाह्यवळण रस्ता सुरू झाल्यानंतर ठाणे, नवी मुंबई या शहरांच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी नवी मुंबई आणि कल्याणदरम्यानचा कल्याण-शीळ मार्ग कोंडीग्रस्त झाला आहे. उरण, जेएनपीटी येथून भिवंडीच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक या मार्गे सुरू झाल्याने शीळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी कल्याण, डोंबिवलीतून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी नवी मुंबईमार्गे वाट धरल्याने गेले दोन दिवस या मार्गावरून प्रवास करण्यासाठी कल्याण ते घणसोली या अंतरासाठी तब्बल दोन-अडीच तास मोजावे लागत आहेत.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून निघणारी अवजड वाहने मोठय़ा संख्येने मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने प्रवास करतात. ही वाहने नवी मुंबईतून शीळ फाटामार्गे मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. मुंब्रा बाह्यवळण रस्ता मे महिन्यापासून दुरुस्तीसाठी बंद होता. त्यामुळे शीळ फाटय़ावरील अवजड वाहतुकीचा भार ठाणे, नवी मुंबईतील अन्य रस्त्यांवर पडत होता. मात्र सोमवारपासून मुंब्रा बाह्यवळण रस्ता वाहतुकीस खुला करून देण्यात आल्याने अवजड वाहने पुन्हा शीळ मार्गावरून धावू लागली आहेत. या वाहनांचा भार वाढल्याने मुंब्रा येथील वाय जंक्शन ते शीळ फाटा चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

दहिसर मोरी गावापासून ते वाय जंक्शन मार्गावर तसेच एमआयडीसी पाइपलाइन रोड, शीळ फोटा-महापे रोड या मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

डोंबिवली-कल्याण येथूनदेखील शीळ फाटा भागात येणाऱ्या वाहनांची संख्या ही वाढल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी देसाई गाव ते शीळ फाटा मार्गावर बुधवारी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरदेखील बुधवारी मोठी कोंडी झाली होती. कळवा-विटावा भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दूर राहण्यासाठी वाहतुकीसाठी शीळ फाटा मार्गाचा अवलंब केला जात असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले.

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग सुरू झाल्यामुळे शीळ फाटा भागात कोंडी होत आहे. कोंडी सोडवण्यासाठी मुंब्रा वाहतूक शाखेतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोकण, पुणे या भागात जाण्यासाठी अनेक नागरिक याच मार्गावरून प्रवास करीत आहेत. परिणामी या मार्गावर कोंडी होत आहे.

– संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा वाहतूक शाखा