४६ लिपिकांकडे बढतीसाठी वसई महापालिकेची विचारणा

वसई-विरार महापालिकेने प्रभारी साहाय्यक आयुक्तपदावर काम करण्यासाठी महापालिकेतील लिपिकांकडे विचारणा केली आहे. तब्बल ४६ लिपिकांना पालिका प्रशासनाने पत्र लिहून बढतीसाठी विचारणा केली आहे. ज्यांनी संमती दिली त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार या पदावर बढती देण्यात येणार आहे.

वसई-विरार महापालिकेत अधिकाऱ्यांची कमतरता आहे. शासनाकडून नव्याने भरती प्रक्रिया होत नसल्याने अनेक पदे रिकामी आहेत. त्याचा परिणाम पालिकेच्या दैनंदिन कामावर होत असतो. त्यातच विविध कारणांमुळे काही पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे अडचणींत भर पडली आहे. यासाठी पालिकेने आता आपल्या वरिष्ठ लिपिक आणि लिपिकांना प्रभारी साहाय्यक आयुक्त बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आस्थापना विभागामार्फत या लिपिकांना प्रभारी साहाय्यक आयुक्तपदी काम करण्यास इच्छुक आहात का, याबाबत विचारणा करणारे पत्र पाठविण्यात आले आहे. प्रभाग समिती तसेच विशेष नियोजन प्राधिकरण आदी ठिकाणी ही नियुक्ती केली जाणार आहे. पालिकेने पत्र दिलेल्या ४८ जणांमध्ये ७ वरिष्ठ लिपिक, ३७ लिपिक आणि १ विभाग अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पालिकेकडे एकूण ९ प्रभारी साहाय्यक आयुक्त आहेत. त्यातील दोन प्रभारी साहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत, तसेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्षात दोन प्रभारी साहाय्यक आयुक्तांची आवश्यकता लागणार आहेत. हे सर्व मिळून चार प्रभारी साहाय्यक आयुक्तांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे पालिकेतील लिपिकांना याबाबत पत्राद्वारे विचारणा केली आहे. आतापर्यंत २७ जणांनी प्रभारी साहाय्यक आयुक्त म्हणून काम करण्यास संमती दिली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार प्राधान्य देत त्यांचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाईल आणि त्यातून ही निवड केली जाईल.  – सदानंद सुर्वे, साहाय्यक आयुक्त