ठाणे कला-क्रीडा महोत्सव..ठाणे आर्ट फेस्टिव्हल..आणि ९६ वे अखिल भारतीय नाटय़ संमेलन असे कला, क्रीडा आणि नाटय़ाचा अनुभव देणाऱ्या कार्यक्रमांचे पडघम सध्या ठाणे शहरामध्ये वाजत आहेत. त्याचा मनसोक्त अनुभव ठाणेकर रसिक घेताना दिसत आहेत. संमेलन, फेस्टिव्हल आणि क्रीडा स्पर्धामधून ठाणेकरांना मनोरंजनाची चांगली व्यवस्था झाली असली तरी या सोहळ्यातून ठाणेकरांना मनोरंजनाबरोबरच कलेची आवड, क्रीडा स्पर्धातून जिंकण्याची उर्मी आणि नाटय़ संमेलनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांच्या बुद्धीला खाद्य देणारे सोहळे या निमित्ताने घडल्यास त्याच्या आयोजनातील मुख्य उद्देश साध्य झाला, असे म्हणता येईल.

ठाण्यातील उपवन तलावाच्या काठावर दोन वर्षांपूर्वी एक भव्य-दिव्य फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. ‘उपवन फेस्टिव्हल’च्या या कला महोत्सवात लाखो रसिक, शेकडो कलाकार आणि कलाप्रेमींनी कलेचा मनमुराद आनंद घेतला. मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षी या महोत्सवाचा डोलारा कोसळला आणि त्यानंतर हा फेस्टिव्हल लोकांच्या विस्मृतीमध्ये गेला. कोटय़वधीचा खर्च, लाखो रसिकांसाठी भव्य-दिव्य सोहळा, सगळ्या प्रकारच्या कलांचा समावेश आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचे सादरीकरण असले तरी हा महोत्सव त्यानंतर पुढे जाऊ शकला नाही. यामागचे कारण म्हणजे ठाण्यातील रसिकांनी या महोत्सवाकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले. त्यामुळे या महोत्सवातून केवळ मनोरंजन मिळवून ठाणेकरांनी त्याकडे पाठ केली. ठाण्यामध्ये आयोजित होणाऱ्या सोहळ्यातून ठाणेकर रसिकांना मनोरजंनाबरोबरच त्यांच्या बुद्धीला चालना देणारे, कलाक्षेत्रात दाखल होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाची योजना करणे महत्त्वाचे ठरले. त्याबरोबरच सामाजिक भान लक्षात घेऊन या महोत्सवातून पर्यावरणाच्या दृष्टीनेही विचार केला गेला पाहिजे. या सोहळ्यातून नागरिकांना त्रास होणार नाही तर त्याचा फायदाच अधिक होईल याकडे आयोजकांनी लक्ष देण्याची गरजही या निमित्ताने ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
ठाणे कला-क्रीडा महोत्सव..
सध्या सुरू असलेला महापालिकेचा कला-क्रीडा महोत्सव हा ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून राज्यस्तरीय स्पर्धाची रेलचेल या महोत्सवाच्या निमित्ताने दिसून येत आहे. कब्बड्डी, खो-खो, मल्लखांब, बॅडमिंटन, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक, अ‍ॅथलेटिक्स, ब्रास ब्रॅण्ड अशा क्रीडा स्पर्धाबरोबरच चित्रकला, लघुपट अशा कला स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रावीण्य दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अन्य कला महोत्सवांमध्ये महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय आणि तरुणाई नेमका काय विचार करते याचा प्रत्येय आला. महाविद्यालयीन तरुणांच्या सर्जनशील कलात्मकतेचे दर्शन या निमित्ताने घडले असून फेब्रुवारीच्या अखेपर्यंत ही स्पर्धा घडणार आहे. त्यामुळे पुढील काळातही या महोत्सवातून रसिकांना ज्ञानवर्धक स्पर्धाचा लाभ घेता येईल. या महोत्सवामध्ये नियोजनातील त्रुटींची चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिकांकडून आयोजित होणाऱ्या स्पर्धाविषयी अनेक वेळा अशा शंका घेतल्या जातात. मात्र ठाणे महापालिकेने ही कसर भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
ठाणे आर्ट फेस्टिव्हल..
ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ठाणे आर्ट फेस्टिव्हल यंदा गुलाम अली यांच्या कार्यक्रम घोषणेमुळे वादात पडला आहे. गेल्या वर्षी कळव्यात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला रसिकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे वादामुळे या महोत्सवावर विरजण पडते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र गुलाम अली येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने कला महोत्सवाची कला परंपरा याही वर्षी कायम राहू शकणार आहे. त्यासाठी संघर्षच्या वतीने नियोजनाची तयारी सुरू झाली असून जगविख्यात चित्रकार दीनानाथ दलाल, एस.एम.पंडित यांच्यासारख्या दिग्गजांची चित्रे या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय अनेक दर्जेदार चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने भरणार आहे. सुमारे २० हजार चौरस फुटांच्या कला दालनामध्ये हे प्रदर्शन उभे राहू शकणार आहे. तसेच हिंदी मराठी संगीतकारांचे कार्यक्रमसुद्धा या निमित्ताने रसिकांना तृप्त करू शकणार आहे. या महोत्सवातून राजकारण आणि वाद होण्यापेक्षा ठाणेकरांना कलेचा आस्वाद घेण्याची पुरेपूर संधी मिळणे गरजेचे आहे.
९६ वे अखिल भारतीय नाटय़ संमेलन
अखिल भारतीय नाटय़ संमेलन हे मराठी नाटय़कर्मी आणि नाटय़रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ते संमेलन आपल्याकडे व्हावे यासाठी नाटय़ परिषदेच्या वेगवेगळ्या शाखा नेहमीच प्रयत्न करत असतात. बेळगाव येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनानंतर ते कोणत्या शहरात होणार याची निश्चिती नोव्हेंबर अखेपर्यंत झाली नव्हती. अखेर सातारा नाटय़शाखेने दुष्काळाचे कारण देऊन नाटय़ संमेलनासाठी नकार कळवल्यानंतर हे संमेलन ठाण्याच्या पारडय़ात पडले. ठाणे नाटय़ शाखेने नेहमीच नाटय़ संमेलनाच्या आयोजनाच्या तयारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावर्षी ऐनवेळी म्हणजे अवघे दोन महिने अगोदरच ही जबाबदारी ठाणे शाखेला मिळाली. यापूर्वी नाटय़ संमेलन कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये आयोजित करण्यात आले असून ठाणे शहरामध्ये मात्र पहिल्यांदा हे संमेलन भरवले जात आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजनाचा अनुभव असलेले ठाणेकर हे संमेलन नक्कीच भव्य-दिव्यपणे साजरे करतील. संमेलनाचे आयोजन आता अंतिम टप्प्यात आले असून गुरुवार ११ फेब्रुवारीपासून संमेलनाच्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार आहे. १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान मुख्य संमेलन साजरे होणार आहे. ठाणेकरांना कला सादर करण्यासाठी वेगळा रंगमंच, ठाण्यातील नाटय़संस्थांसाठी खास सादरीकरणाची संधी आणि नियोजित कलाकार
रजनी यासाठी नियोजन समिती विशेष आग्रही
असून या माध्यमातून नेमके नवे काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता ठाणेकर रसिकांना लागून राहिली आहे.

डोंबिवलीची जत्रा..
ठाणे शहरात महोत्सव, संमेलनाचे पडघम वाजत असताना डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने कलेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न डोंबिवलीकरांना झाला आहे. या जत्रेमध्ये कलेचे दर्शन घडत असतानाच मनोरंजन आणि खाद्यसंस्कृतीचा अस्वादही घेण्याची संधी इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच डोंबिवलीकर जत्रामय झाले आहेत. कलेच्या क्षेत्राची ओळख करून देण्यामध्ये या महत्त्वाचे काम केले आहे. त्यामुळे या महोत्सवाने करिअरची वेगळी वाट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.