कल्याणमधील ठाणगेवाडीतील प्रकार; विकासकाला वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांचा प्रताप

कल्याण पश्चिमेतील ठाणगेवाडीत एका विकासकाने पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने विकास आराखडय़ातील रस्त्यामध्ये एक इमारत उभारल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. विकास आराखडय़ातील १५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणात ही इमारत बाधा आणत असल्याने अधिकाऱ्यांनी चक्क विकास आराखडय़ातील रस्ता रेषा नियमबाह्य़ रीतीने बदलून बाजूच्या चाळींवर दाखवल्यामुळे चाळीतील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

ठाणगेवाडीतील १५ मीटरच्या विकास आराखडय़ातील रस्त्यामध्ये नियमबाह्य़ इमारत उभारताना विकासकाने लगतच्या १० चाळींचा ‘विकास हस्तांतरण हक्क’ (टीडीआर) चाळीतील रहिवाशांना अंधारात ठेवून वापरला आहे. याप्रकरणी चाळीतील रहिवाशांनी कल्याण न्यायालयात तेरा वर्षांपूर्वी दावा केला होता. न्यायालयाने चाळीतील भौगोलिक क्षेत्र ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश पालिकेला वेळोवेळी दिले आहेत. तरीही पालिका अधिकारी आता ‘व्यापक जनहिता’चा मुद्दा पुढे करून अधिकृत पाच चाळींमधील पंधरा रहिवाशांना नोटिसा पाठवून रस्ता रुंदीकरणासाठी जागा खाली करा म्हणून तगादा लावून आहे. महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमातील २१२ (२)च्या जमीन ताब्यात द्याच्या नोटिसा पाठवून रहिवाशांना पालिकेकडून हैराण केले जात आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयाकडून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. मालकी हक्काच्या चाळींवर कारवाई झाली तर १५ कुटुंब बेघर होणार आहेत.

प्रकरण काय?

विकासक वाधवा यांनी पाच चाळींच्या जागेवर ‘आर्य वास्तू’ इमारत उभी केली. या बांधकामाला नगररचना विभागाने सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या. हे बांधकाम विकास आराखडय़ातील १५ मीटरच्या रस्त्याने बाधित होत आहे; याची माहिती नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना असूनही त्यांनी त्याकडे डोळेझाकपणा केला, अशी रहिवासी कोळगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. इमारत उभारताना रस्ता नियंत्रण रेषा नगररचना अधिकाऱ्यांनी शासनाची परवानगी न घेता व सर्वसाधारण सभेला माहिती न देता परस्पर स्थलांतरित केली आहे. त्यामुळे या भागातील मालकी हक्काच्या जागेवर उभ्या असलेल्या उर्वरित पाच चाळी अधिकाऱ्यांमुळे बाधित होत आहेत.

विकासक वाधवा यांनी ज्या भूखंडावर इमारत उभी केली आहे. तो त्यांचा भूखंड आहे. त्या भूखंडावरून त्यांच्या इमारतीच्या जल, मलनिस्सारण वाहिन्या गेल्या आहेत. विकास आराखडय़ातील रस्ता रेषा पाहून यापूर्वी विकासकाने इमारत बांधली आहे. त्यामुळे रस्ता रेषा बदलण्याचा प्रश्न येत नाही. आराखडय़ातील रस्ता रेषा बदलण्याचा अधिकार पालिकेला नाही. प्रस्तावित आराखडय़ाप्रमाणे रस्तारुंदीकरणाचे काम ठाणगेवाडीत करण्यात येत आहे.

– सुरेंद्र टेंगळे, नगररचनाकार, कडोंमपा

विकास आराखडय़ातील रस्ता रेषा विचारात घेऊन आर्य वास्तू इमारत उभारली आहे. आम्ही तेथे कोणतेही वाढीव व विस्तारित बांधकाम केलेले नाही. नियमानुसारच ती इमारत उभी आहे. विकास आराखडय़ाप्रमाणे पालिका रस्तारुंदीकरण करत असून आमच्या इमारतीसाठी अन्य चाळींवरून रस्ता दाखविण्यात आला आहे, ही जी ओरड होत आहे, ती चुकीची आहे.

– अनिकेत वाधवा ,  वाधवा ग्रुप, कल्याण