बाबूराव गळदगेकर  : सध्याच्या ‘आयटी’च्या जमान्यात चांगली संधी व पॅकेज मिळाले की नोकरी बदलण्याकडे बहुतांश तरुणांचा कल असतो. पण काही वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. एकदा नोकरी आणि तीही शक्यतो सरकारी मिळाली की निवृत्त होईपर्यंत आहे त्याच जागी किंवा फार फार तर मिळालेल्या बढतीवर समाधान मानले जात असे. वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी विहित वयोमानानुसार ती व्यक्ती निवृत्त होत असे. निवृत्तीनंतर शासकीय निवृत्तिधारकांना त्यांचे निवृत्तिवेतन, भविष्य निर्वाह निधी, वेळोवेळी नेमण्यात आलेल्या वेतन आयोगाचे फायदे मिळतात. पण काही जणांच्या बाबतीत निवृत्तिवेतनाचे काम सुरळीत होत नाही. निवृत्तिधारकाला निवृत्तिवेतन, भविष्य निर्वाह निधी मिळण्यात, किंवा त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या वारसांना ते निवृत्तिवेतन सुरू होण्यात काही समस्या येतात. अशा वेळी काय करायचे, कोणाकडे पत्रव्यवहार करायचा याची माहिती नसल्याने त्या मंडळींची फार ओढाताण होते. मानसिक त्रास होतो. हे सगळे लक्षात घेऊन बाबूराव गळदगेकर यांनी निवृत्तीनंतर हेच प्रश्न सोडविण्याचे काम हाती घेतले आहे.
मूळचे कोल्हापूरचे असलेले गळदगेकर नोकरीच्या निमित्ताने मुंबईत अंबरनाथला आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातून ते कार्यालयीन अधीक्षक या पदावरून ३१ जुलै १९८८ मध्ये धुळे येथून निवृत्त झाले. नोकरीची सुरुवात कोल्हापूर येथूनच झाली. पुढे सातारा, पुणे, कऱ्हाड, चिपळूण, मुंबई येथे त्यांनी काम केले. वयाची पंचाहत्तरी पार केलेले गळदगेकर व त्यांच्या सौभाग्यवती पद्मा हे कधी त्यांच्या अंबरनाथ येथील घरी तर कधी ठाण्याला त्यांचा मुलगा, सून व नातवाबरोबर राहतात. अंबरनाथ येथील सेवानिवृत्तिधारकांचा सेवा संघ या संघटनेचे गेली अनेक वर्षे ते काम करत असून सध्या ते संघटनेचे अध्यक्ष आहेत. याच संघटनेने गळदगेकर यांनी लिहिलेल्या ‘सेवानिवृत्तिधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना उपयुक्त मार्गदर्शिका’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात गळदगेकर यांनी निवृत्तिवेतन तयार करण्याची कार्यपद्धती, सेवानिवृत्तिवेतन, कुटुंब निवृत्तिवेतन, निवृत्तीसमयी मिळणारे अन्य लाभ, सहाव्या वेतन आयोगापासून झालेली महागाई भत्त्यातील वाढ, भविष्य निर्वाह निधी, इच्छापत्र का आणि कसे तयार करावे, आयकर आकारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
निवृत्त होण्याच्या काही वर्षे आधी गळदगेकर हे धुळे येथे होते. इथे असताना ते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेत निवृत्तिवेतन, निवृत्तिवेतनाची प्रकरणे कशी तयार करायची, याबाबत व्याख्याने द्यायचे. नोकरीत असताना काही सहकाऱ्यांच्या निवृत्तिवेतनात आलेल्या अडचणी सोडविल्या होत्या. त्यामुळे या विषयाची माहिती होतीच. निवृत्तीनंतर अंबरनाथच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या सेवा संघात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. २००० पासून गळदगेकर निवृत्तिवेतनधारकांसाठी काम करत आहेत. गळदगेकर यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन (पुणे), ठाणे जिल्हा पेन्शनर्स अ‍ॅण्ड सिनियर वेल्फेअर असोसिएशन यांच्या तर्फे त्यांना गौरविण्यातही आले आहे. गळदगेकर यांचे हे काम प्रामुख्याने राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आहे.
आवश्यक त्या कागदपत्रांची अनुपलब्धता, वेळोवेळी मिळालेल्या आदेशांची व्यवस्थित जपणूक केलेली नसणे, निवृत्तिवेतनधारक किंवा त्याच्या कुटुंबीयांना संबंधितांशी काय व कसा पत्रव्यवहार करायचा याची माहिती नसणे, सेवापुस्तकातील माहिती अपुरी असणे, अर्जावर स्वाक्षरी न करणे, केल्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या कागदांवर केलेल्या आहेत ते लक्षात नसणे, निवृत्त झालो त्या महिन्यातील वेतन काय होते, निवृत्त होण्यापूर्वीच्या महिन्यात कोणते भत्ते मिळाले, वेतनातून वजावट काय झाली याचीही माहिती नसणे, अशा काही गोष्टींमुळे निवृत्तिवेतनधारकाला निवृत्तिवेतन मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे गळदगेकर यांचे म्हणणे आहे.
हे सर्व टाळण्यासाठी निवृत्तिवेतनधारकाने काही खबरदारी घेतली पाहिजे. आपले सेवापुस्तक व्यवस्थित पूर्ण भरले आहे का, निवृत्त होण्यापूर्वी सहा महिने अगोदर ते महालेखाकार-मुंबई यांना पाठविले गेले आहे का, याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. तसेच महालेखाकारांकडून आलेले आदेश व्यवस्थित सांभाळून ठेवावेत. कारण या आदेशात त्याच्या स्वत:च्या निवृत्तिवेतनाबरोबरच त्याच्या पश्चात मिळणाऱ्या कुटुंब निवृत्तिवेतनाचाही उल्लेख असतो. वेळोवेळी ज्या सुधारणा होतात, त्याची नोंद ठेवून संबंधितांशी पत्रव्यवहार करावा, आपल्या कार्यालय प्रमुखाकडून आपल्या निवृत्तिवेतनाबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होते आहे की नाही याचीही माहिती ठेवावी, त्याबाबत पाठपुरावा करावा, असा सल्लाही गळदगेकर देतात.
गळदगेकर यांनी मुंबई व ठाणे परिसरासह पुणे, कोल्हापूर येथील निवृत्तिधारकांचे प्रश्न सोडविले आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तसेच संबंधितांकडे पाठपुरावा करून त्यांनी कोल्हापूर येथील पाटील नावाच्या महिलेला कुटुंब निवृत्तिवेतनात ३७५ रुपयांवरून २ हजार २३५ रुपयांपर्यंत वाढ करून देण्यात तसेच थकबाकीपोटी १ लाख ५१ हजार रुपये मिळवून देण्यात मोलाची मदत केली आहे. पुणे येथील लक्ष्मीबाई दीक्षित यांच्या निवृत्तिवेतनात दरमहा ५०० रुपयांची वाढ मिळवून देऊन ६६ हजार रुपये थकबाकीही मिळवून दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्याच्या नोकरीत असताना जर मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्या कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीशी संलग्न असलेल्या योजनेतून जास्तीतजास्त ६० हजार रुपये मिळतात. उल्हासनगर येथील कुरणे व अंबरनाथ येथील कदम कुटुंबीयांना गळदगेकर यांनी ही रक्कम मिळवून दिली आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर जे शासकीय नोकरीत रुजू झाले आहेत, त्यांना ही योजना लागू नाही.
निवृत्तिवेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा कोषागारातर्फे त्रमासिक मेळाव्यांचे आयोजन केले जाते. मात्र त्यांना आवश्यक तेवढी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे या मेळाव्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच हे मेळावे जिल्ह्य़ाच्या ठिकाणी होत असल्याने सर्वच निवृत्तिवेतनधारकांना वयपरत्वे तेथे हजर राहता येत नाही. त्यामुळे जिल्हा कोषागाराने असे मेळावे तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालयात घ्यावेत, असे आवाहनही गळदगेकर यांनी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना केले आहे. कोषागारातील निवृत्त अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तांच्या संघटनांसाठी आपणहून पुढे येऊन काम करावे. यातून सेवानिवृत्तिधारकांच्या निवृत्तिवेतनाचे प्रश्न जलद गतीने सुटण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांना वाटतो.
हे काम करत असताना निवृत्तिवेतनधारकांचे अनेक प्रश्न समोर आले. बऱ्याच समस्या समाधानकारकपणे सोडविता आल्या. कोल्हापूर येथील पाटील बाईंचे त्यांना आलेले पत्र त्यांच्या कामाची पावती आहे. आम्हा वृद्धांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण खूप कमी येतात. तुम्ही तो आनंद मिळवून दिला आहे, अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गळदगेकर यांना धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे हे काम करताना जे मानसिक समाधान आणि आनंद मिळतो तो माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, असे गळदगेकर यांना वाटते.

बाबूराव गळदगेकर यांचा दूरध्वनी संपर्क :
०२२-२५८९३९०२/ ९९३०६२९०५८
शेखर जोशी – shekhar.joshi@expressindia.com