कल्याण पश्चिमेतील आधारवाडी ते तुरुंग रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे. पाऊस सुरू झाला तरी हे काम व बाजूच्या गटारांची कामे पूर्ण न झाल्याने या भागातील पादचारी, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येतील, असा दावा प्रशासनाने केला होता. तो दावा आता फोल ठरला आहे.
लालचौकी, शेलार चौक ते तुरुंग रस्त्याकडे जाताना सरकारी गोदामे लागतात. या रस्त्यालगत सिमेंट काँक्रीट रस्ते व गटारे तयार करण्याची कामे सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या आहेत. नाशिक महामार्गाकडे जाण्यासाठी लालचौकी, दुर्गाडी चौक ते पडघा हा मधला रस्ता असल्याने कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी वाहने आधारवाडी रस्त्याने पुढील मार्गाला निघून जातात. अवजड वाहनांची या रस्त्यावरून सतत ये-जा असते. शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांच्या बसची या भागात सतत वर्दळ असते. आधारवाडी तुरुंगापुढे एक महाविद्यालय आहे. त्यामुळे दुचाकी स्वार, रिक्षाचालक, खासगी वाहने, बस यांची या रस्त्यावर सतत वर्दळ असते. अशा वर्दळीत आधारवाडी भागातील सिमेंट रस्त्यांची कामे रखडल्याने वाहनचालकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात. या रस्त्यालगत गटारांची कामे सुरू आहेत. या गटारांची कामे पूर्ण झालेली नाहीत. आजूबाजूला माती, कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामधून वाट काढीत पादचाऱ्यांना घर गाठावे लागते. सिमेंट रस्ते काम करताना सरकारी गोदामाजवळील रस्ता उंच सखल झाला असल्याने या भागात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने तातडीने डांबर टाकून या रस्त्याचा भाग समांतर करून घेण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.