रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम व रेल्वेकडून जबाबदारीबाबत टाळाटाळ

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : वसई-विरार शहरांमधील उड्डाणपुलाची दुरवस्था होत असताना सर्वच प्रशासकीय यंत्रणा खांदेपालट करत जबाबदारीतून पळवाटा शोधत आहेत यामुळे शहरात असलेल्या उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम रखडले आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याने पुलांची दुरवस्था होत आहे.

विरार पूर्व पश्चिम, नालासोपारा पूर्व पश्चिम आणि वसई पूर्व पश्चिम असे तीन उड्डाणपूल शहरात अस्तित्वात आहेत. हे तीनही पूल वेगवेगळ्या आस्थापनाने बांधले असल्याने त्याच्या दुरुस्ती आणि देखरेखेची जबाबदारी विभागलेली आहे. पण यातही या यंत्रणा जबाबदारी एकमेकांकडे ढकलून हात वर करीत आहेत. यामुळे वर्षांनुवर्षे उड्डाणपुलाची दुरवस्था होत आहे.

विरारचा पूर्व व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग, वसई-विरार महानगरपालिका आणि रेल्वे यांनी बांधला आहे. तर नालासोपारा येथील पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी बांधला आहे तर वसई पूर्व पश्चिम जोडणारा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे यांनी बांधला आहे. पण या पुलांवर वाढती रहदारी यामुळे या पुलांची दुरवस्था होत आहे. या पुलांची नियमित दुरुस्ती आणि देखरेख होणे गरजेचे असताना सर्वच प्रशासन याकडे कानाडोळा करत आहेत.

शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलांच्या दुरवस्थेमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच काही वर्षांतच उड्डाणपूल धोकादायक बनले आहेत. त्यामुळे यांची दुरुस्ती आणि पुनर्बाधणी करण्याची गरज आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम  विभाग व रेल्वे प्रशासन  किंवा वसई-विरार शहर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे  यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.

नालासोपाऱ्याच्या पुलासाठी पालिकेचे २५ वर्षे सर्वेक्षण

नालासोपारा येथील उड्डाणपुलाला साधारण ३० वर्षे झाली आहेत. या पुलाच्या खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्डय़ात रस्ता अशी स्थिती झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच लहान-मोठय़ा अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

वास्तविक हा उड्डाणपूल बनविला त्या वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहतूक होईल हे गृहीत धरण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्या हा नागरिकांना प्रवासासाठी गैरसोयीचा आहे. या पुलांना साहाय्यक असे दक्षिण आणि उत्तरेकडून पूल बांधणे गरजेचे होते. अल्कापुरी ते नालासोपारा पश्चिम आणि सेंट्रल पार्क ते निळे गावाच्या पलीकडे असे दोन प्रस्तावित उड्डाणपूल आहेत. या मार्गाच्या संरचनाचे रेखाटनही तयार आहे. याबाबत पालिकेत आम्ही ठराव संमत केला होता. मात्र पालिकेने फक्त सर्वेक्षण एजन्सीकडे सर्वेक्षणाचे काम दिले. पुढे सर्वेक्षणाच्या अहवालावर कोणतीच कार्यवाही केली नाही. गेल्या २५ वर्षांपासून पालिका फक्त सर्वेक्षणच करत आहे, असा आरोप  शिवसेनाचे माझी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी केला आहे.

दुरुस्तीनंतर १ वर्षांतच वसईचा पूल धोकादायक

वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे दोन उड्डाणपूल आहेत. हे उड्डाणपूल अंबाडी रोड येथे आहेत. सर्वात जुना पूल १९८१ साली बांधण्यात आला होता. मात्र मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही वाढत होती, वाहतूक कोंडी होत होती. यामुळे नवीन पूल साधारण २०१६ मध्ये बनविण्यात आला. दोन्ही पुलांवरून एकमार्गी वाहतूक सुरू केली गेली. मात्र जुन्या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे जर्जर झाले आहेत. कठडय़ाच्या आतून अनेक पाइपलाइन काढण्यात आल्यामुळे त्यातील पाणी पुलावरच झिरपत होते. त्यामुळे पाणी मुरून पुलाचा मुख्य खांब धोकादायक झाला होता. म्हणून २०१८ मध्ये पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

जुन्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यावर एका वर्षांनंतर पूल कमकुवत बनला. पुलाला तडे गेलेत. पाहणीत पूल धोकादायक ठरला आहे. त्यामुळे अतिजड, जड वाहनांची ये-जा रोखण्यात आली आहे. बांधकामाची व्यवस्थित तपासणी, पाहणी न केल्यामुळे कमी दर्जाचे बांधकाम झाले असल्याचा आरोप होत आहे. यामुळे नागरिकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. वसईचा पूल एका वर्षांतच धोकादायक झाल्यामुळे खर्च केलेल्या कोटय़वधी रुपयांचा चुराडा झाला आहे.

१० वर्षांत विरारचा उड्डाणपूल जीर्ण

विरारचा पूर्व व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वसई-विरार शहर महानगरपालिका यांनी संयुक्तरीत्या बांधला. या पुलाला १० वर्षे झाली आहेत आणि हा पूल जीर्णसुद्धा झाला. रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. याकडे पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सततची वाहतूक कोंडी, अपघात यामुळे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. मात्र प्रशासनाला पूल कोसळल्यावर जाग येईल, असा आरोप वसई विरारमध्ये राहणारे लाखो लोक करीत आहेत.

रेल्वे फक्त रेल्वे रुळावरून जाणाऱ्या पुलाच्या भागाची देखभाल करते, बाकी इतर तत्सम प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रेल्वेच्या भागातील भाग रेल्वेकडून पाहणी करून दुरुस्त केला जाईल.
– रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

शहरातील सर्व पूल हे वेगवेगळ्या आस्थापनेकडे आहेत, त्यांची दुरुस्ती करण्याचे काम त्यांचे आहे. पण तरीही शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिका पुलांवरील खड्डय़ांची डागडुजी तसेच इतर छोटी देखभाल करते.
– राजेंद्र लाड, मुख्य शहर अभियंता, वसई-विरार महानगरपालिका

सार्वजनिक बांधकाम विभागातील भाग आम्ही पाहणी करून दुरुस्त करू पण इतर आस्थापनेतील भाग त्यांनी दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
– विवेक बडे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, पालघर