‘३१’ला पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत संभ्रम

सरत्या वर्षांला निरोप देण्याच्या निमित्ताने राज्यभरातील हॉटेल आणि बारना पहाटेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली असली तरी ठाणे शहरातील बार व हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांनी अद्याप तशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील बार व हॉटेलमालकांमध्ये  संभ्रमाचे वातावरण आहे.

३१ डिसेंबरचा दिवस म्हणजे हॉटेल व बार व्यावसायिकांसाठी सोन्याचा दिवस असतो. यादिवशी भरपूर कमाई होत असल्याने ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हॉटेल व बारमध्ये आकर्षक सवलती दिल्या जातात. तसेच विविध करमणूक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारनेही ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी हॉटेल व बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बारमालकांचे आणखी फावले आहे, परंतु ठाण्यातील बार तसेच हॉटेलांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक व्यावसायिकांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले, मात्र पोलिसांनी त्यावर निर्णय दिलेला नसल्याचे बारमालकांचे म्हणणे आहे.

ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षीही थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत बार तसेच हॉटेल सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली नव्हती. यामुळे या व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेऊन अखेरच्या क्षणी परवानगी मिळवली होती. यंदाही थर्टी फर्स्टला एक आठवडा राहिलेला असतानाही एकाही व्यावसायिकाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील बार रात्रीच बंद करावे लागणार आहेत. थर्टी फर्स्ट निमित्ताने बार तसेच हॉटेलमध्ये विविध कार्यक्रम तसेच पाटर्य़ाचे बेत आखणाऱ्या व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

‘परवानगी मिळण्याची आशा’

राज्य शासनाने पहाटे पाच वाजेपर्यंत बार तसेच हॉटेल सुरू ठेवण्याची मुदत दिली असून त्यानुसार मुंबई तसेच नवी मुंबईतील व्यावासायिकांना अशा प्रकारचे परवाने मिळाले आहेत, मात्र ठाण्यातील व्यावसायिकांना अद्याप परवाने मिळालेले नाहीत. शहरातील व्यावसायिकांनी परवाने मिळविण्यासाठी अर्ज केले असून त्या आधारे पोलीस परवाने देतील, अशी अपेक्षा आहे, असे ठाणे हॉटेलमालक असोसिएशनचे अध्यक्ष साईप्रसाद शेट्टी यांनी दिली. यासंबंधी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याशी संपर्क साधला असता राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती घेतलेली नाही, असे त्यांनी सांगितले. शासनाचा अध्यादेश पाहून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.