बेल्जिअम मेलोनोईस
प्राण्यांची आवड असलेल्या व्यक्ती आपल्या घरात या प्राण्यांना हक्काचे स्थान देतात. मालक जीवाभावाने या प्राण्यांना जपतातच. पण माणसापेक्षाही आपुलकीची भावना काही प्राण्यांना समजते. श्वानांना याचसाठी घराघरांत विशेष स्थान दिले जाते. स्पर्शातून जिव्हाळा व्यक्त करणारे श्वान आपलेसे वाटतात. आपल्या मालकाच्या भावना समजण्याचे विलक्षण सामथ्र्य श्वानांमध्ये असते. वेगवेगळ्या जातींमध्ये अस्तित्वात असणाऱ्या श्वानांनी त्यांच्या गुणवैशिष्टय़ांमुळे जगभरातील श्वानप्रेमींना आकर्षित केले आहे. पठाणकोठ येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात एका इमारतीत अतिरेकी होते. इमारतीत कुणी प्रवेश करू नये, यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वारावर अतिरेक्यांनी आग लावली होती. यावेळी सैन्यदलातील ‘रॉकेट’ नावाच्या श्वानाने या आगीतून स्वत:ला पार करत इमारतीमधील एक वस्तू आणून दिली होती. रॉकेट या कसरतीत किरकोळ जखमी झाला. सध्या आपल्या जबाबदारीसाठी पुन्हा सज्ज असलेल्या रॉकेटला २०१६ वर्षांचा ‘गॅलंट्री’ पुरस्कार देण्यात आला आहे. अडथळ्यांना पार करत आव्हान स्वीकारणाऱ्या या श्वानांची प्रजात म्हणजे ‘बेल्जिअम मेलोनोईस’. ओसामा बिन लादेनला भूमिगत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या युनिटमध्ये कायरो नावाचा श्वान बेल्जिअम मेलोनोईस याच श्वान प्रजातीपैकी होता. मूळचे बेल्जिअम देशातील असलेले बेल्जिअम मेलोनोईस श्वान अतिशय आत्मविश्वासू आणि कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात.
आपत्कालीन परिस्थितीत योगदान
कधीही न थकणारे हे श्वान कायम कठीण अडथळ्यांना पार करण्यासाठी तत्पर असतात. नार्कोटेस्ट, अमली पदार्थ शोधण्याच्या पथकात या श्वानांचा उपयोग होत असतो. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी या श्वानांचे उत्तम योगदान आहे.
प्रशिक्षणातील आज्ञाधारक श्वान
आज्ञा पाळण्यासाठी हे श्वान उत्तम मानले जातात. कायम काम करत राहण्याची सवय असल्याने या श्वानांची शारीरिक क्षमता इतर श्वानांपेक्षा अधिक असते. वेगवेगळ्या सुरक्षा दलात बेल्जिअम मेलोनोईस जातीच्या श्वानांचा उपयोग केला जात असल्याने या श्वानांना उत्तम प्रशिक्षणाची गरज असते. पाचव्या महिन्यापासून सुरू होत असलेले या श्वानांचे प्रशिक्षण वर्षभरात पूर्ण होते. सुरुवातीला आज्ञा पाळायला शिकवणे आणि कालांतराने एखाद्या वस्तूचा मागोवा घेणे, जमिनीत खोल पुरलेली वस्तू शोधून काढणे यासारखे प्रशिक्षण या श्वानांना दिले जाते.
घरात पाळण्यास योग्य, पण..
घरात पाळण्यासाठीही ‘बेल्जिअम मेलोनोईस’ हे श्वान योग्य असले तरी त्यांना नियमित व्यायामाची आवश्यकता असते. घरात राखण करण्यासाठी या श्वानांचा उपयोग होतो. किमान दोन तास या श्वानांना व्यायामाची गरज असते. सतत काम द्यावे लागते. फिरण्यासाठी, धावण्यासाठी घराबाहेर न्यावे लागते. पुरेसा व्यायाम या श्वानांना न मिळाल्यास मानसिक संतुलन बिघडून हे श्वान रागीट होण्याची शक्यता असते. व्यायामाची पूर्तता पूर्ण न झाल्यास घरातून पळून जाण्यासाठी हे तत्पर असतात. एवढा व्यायाम या श्वानांसाठी आवश्यक असतो. आहार उच्च प्रतीचा ठेवल्यास या श्वानांची शारीरिक वाढ योग्य होते.

अडथळे पार करण्याचे कसब
मजबूत शरीरयष्टी, सतत काम करण्याची सवय, एखादे आव्हान स्वीकारण्याची आणि यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे सामथ्र्य ‘बेल्जिअम मेलोनोईस’ या जातीच्या श्वानांमध्ये असते. आव्हान स्वीकारल्यावर कितीही कठीण अडथळे असले तरी ते पूर्ण करण्याचे विलक्षण कसब या श्वानांमध्ये असल्याने जगभरातील सैन्य दलात, सीमा सुरक्षा दलात, पोलीस दलात बेल्जिअम मेलोनोईस या जातीच्या श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. भारतात राष्ट्रीय सुरक्षा दलात या जातीच्या श्वानांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जातो.