ठाणे : नाशिक येथून मुंबईत अल्युमिनीयमच्या पट्ट्या वाहून नेणारा टेम्पो जप्त करून तो सोडविण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कळवा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. या प्रकारामुळे ठाणे शहरात पोलीस दलात लाचखोरीची कीड लागल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत वडिलांकडून व्यसनी मुलाचा खून

तक्रारदार यांचे नाशिक येथील वाडीवरे परिसरात अल्युमिनीयम पट्ट्या बनविण्याचा कारखाना आहे. कारखान्यात तयार होणाऱ्या अल्युमिनीयम धातूच्या पट्ट्या मुंबई येथे विक्रीसाठी पाठविल्या जातात. १६ एप्रिलला या कारखान्यातून एका टेम्पोमधून ॲल्युमिनीयमच्या पट्ट्या मुंबई येथे आणल्या जात होत्या. त्यावेळी कळवा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा टेम्पो जप्त केला. दरम्यान, तक्रारदार हे टेम्पो आणि त्यामधील साहित्य सोडविण्यासाठी कळवा पोलीस ठाणे येथे गेले असता, पोलीस हवालदार दराडे यांनी स्वत:करिता, पोलीस उपनिरीक्षक पोतेकर आणि कळवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी एकूण दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. २४ एप्रिलपर्यंत पैसे दिले नाही, तर टेम्पो आणि त्यामधील सामान असाच पडून राहील अशी धमकी तक्रारदाराला देण्यात आली. त्यामुळे २४ एप्रिलला तक्रारदार हे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गेले. त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.

हेही वाचा : बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, दराडे याने लाच मागितल्याचे आणि पोतेकर याने लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून कळवा पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर दराडे याला १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणात पोतेकर यालाही पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.