जगातल्या प्रत्येकाशी मनाचे वैश्विक नाते जोडणारा कलाप्रकार म्हणजे नृत्य. नृत्य या कलाप्रकाराला खरेतर कोणतीही मर्यादा नाही. आंतरराष्ट्रीय नृत्यदिन निमित्त नृत्याची आणि वैश्विक नात्यांची ही घट्ट गुंफण घालणारा कार्यक्रम ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाटय़गृह येथे नुकताच पार पडला.
प्राचीन शास्त्रीय नृत्यशैली असणाऱ्या कथ्थक आणि भरतनाटय़म या नृत्यप्रकाराचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील डॉ. पल्लवी नाईक, पल्लवी म्हैसकर, दर्शना कामेरकर, अनुजा शहासने  या नृत्यांगणांनी मिळून हा कार्यक्रम सादर केला. ठाण्यातील सुप्रसिद्ध कलाकार मंजिरी देव आणि मुकुंदराज देव हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे कथ्थक आणि भरतनाटय़म या दोन्ही नृत्यशैलीची सांगड घालणारा हा कार्यक्रम प्रथमच ठाणेकरांना अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमामध्ये कलाकारांनी दोन्ही शैलीतील भिन्नता आणि एकरूपता एकाच वेळी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कथ्थक शैलीचे नृत्य पल्लवी म्हैसकर आणि दर्शना कामेरकर यांनी तर भरतनाटय़म डॉ. पल्लवी नाईक, अनुजा शहासने यांनी सादर केले. त्याचप्रमाणे रोहित देव, श्रीरंग टेंबे, अमृता लोखंडे, यशश्री काळे, अलका लाजमी, व्यंकटेश, बालसुब्रमण्यम, सौम्या यांनी या कार्यक्रमामध्ये साथ संगत दिली.