पोलीस चौकीची तोडफोड तसेच साहित्य चोरी केल्याचे प्रकरण

दहा वर्षांपूर्वी भिवंडी शहरात पोलीस ठाण्याच्या जागेवरून उसळलेल्या दंगलीदरम्यान चौकीची तोडफोड करत दुचाकीला आग लावून तेथील साहित्य चोरल्याचा आरोप असलेल्या १७ जणांची ठाणे न्यायालयाने पुराव्याअभावी  मुक्तता केली आहे.

भिवंडी शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या जागेत बांधकाम करण्यावरून २००६ मध्ये वाद झाला होता. यातूनच भिवंडी शहरात  दंगल उसळली होती. यात जमावाने धामणकर नाका परिसरातील पोलीस चौकीची मोडतोड करत तिथे दुचाकी जाळली होती. तसेच या चौकीतील साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली होती. त्यामध्ये अन्सारी अक्रम सोहेल, अन्सारी वसीम सोहेल, मोहमद रईस सल्लूउद्दीन अन्सारी, सुफीयान जमील कुरेशी, मोहमद आलम सौदागर अली अन्सारी, हसन अस्मान कुरेशी, जाफर इक्बाल अब्दुल जलील अन्सारी, सलीम शाह मोहमद मोमीन, अकील अब्दुल समद खान, नियाज अहमद रईस अहमद अन्सारी, मोहमद सलीम शफीक शेख, रिझवान अब्दुल सलीम ऊर्फ अलीम शेख, तौफीक अहमद समुद्दीन अन्सारी, आसीफ अब्दुल कलाम शेख, इक्बाल अहमद कुटुबुद्दीन अन्सारी, मोहमद अकील मोहमद शकील शेख, मोहमद शकील मोहमद शफीक शेख यांचा समावेश होता. या खटल्याची सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयात झाली. दिलीप बहिराम यांनी सरकारी पक्षाची तर वकील धनंजय पाटील यांनी आरोपींची बाजू न्यायालयापुढे मांडली.

  • भिवंडी शहरात उसळलेल्या दंगलीदरम्यान दोन पोलिसांची हत्या केल्याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तर धामणकर नाक्यावरील पोलीस चौकीची तोडफोड केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
  • त्यापैकी चौकीची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ातील आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. तर दोन पोलिसांची हत्या केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ाच्या खटल्याची अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही, अशी माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. कटके यांनी दिली.