तरुणाई म्हणजे जोश. त्यात बाईकवेडे तरुण म्हणजे होश मागे सारूनच वेगावर स्वार होतात. ठाण्यातील उपवन परिसरात अशा वेगवेडय़ांनी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रहिवाशांच्या उरात सध्या धडकी भरवली आहे. बाईकवर मित्रमैत्रिणींना बसवून अचाट कसरती (स्टंट) करण्यात किती धोका आहे, याची जाणीव नसलेल्या दुचाकीस्वारांना वाहतूक पोलिसांनी काही तरी धडा शिकवावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
उपवन या शांत, निसर्गरम्य परिसरात वाहनांची फारशी वर्दळ नसते. त्याचाच फायदा हे दुचाकीस्वार उचलत आहेत. २०० सीसी क्षमतेचे इंजिन असलेल्या ‘पल्सर एनएस’, ‘एफझेड’, ‘आरवन फाइव्ह’, ‘केटीएम’ (२०० सीसी) याशिवाय निंजा (५०० सीसी) या दुचाकींवर कसरती केल्या जातात. मोटारसायकलसोबत डीओ, व्हेस्पा यांसारख्या कमी क्षमतेच्या स्कूटी घेऊनही काही तरुण कसरती करण्यात गुंतलेले असतात. रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत रस्त्यावर वेगवेडय़ांचा धिंगाणा सुरू होतो. पायलादेवी मंदिराच्या वळणापासून उपवन येथील महापौर बंगल्याकडे सुसाट वेगात येणारे हे बाइकस्वार विशेष करून उपवन तलावाजवळील गतिरोधकावर कसरती करतात.
शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशी बाइकस्वारांच्या हुल्लडबाजीला ऊत येतो. या दिवशी ठाणे तसेच आसपासच्या परिसरातून २० ते २५ मोटरसायकलस्वारांचे  जत्थे या परिसरात येऊन एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. मोटारसायकलींच्या सायलेन्सरला विशिष्ट प्रकारचे ‘फिल्टर’ लावून त्याचा कर्णकर्कश आवाज करीत हे मोटरसायकलस्वार ‘धूम’ करतात. उपवन तलावासमोरील रस्त्याला दुभाजक नसल्याने विरुद्ध बाजूकडील रस्त्यावर अगदी सहजपणे मोटरसायकल आणल्या जातात आणि त्यामुळे या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी उपवन तलावाशेजारील निळकंठ हाइटस् इमारतीत राहणाऱ्या मायलेकास याच बाइकस्वारांपैकी एकाने धडक देऊन जखमी केले. या घटनेनंतर भरधाव वेगात हा बाइकस्वार गांधीनगर परिसराच्या दिशेने पळून गेला.  गेल्या वर्षी उपवन परिसरात तरुणीच्या दुचाकीच्या धडकेत कोकणीपाडा परिसरातील मुलास जीव गमवावा लागला होता.

ठाणे परिवहन सेवेच्या महापौर बंगल्याजवळील बस थांब्यानजीक उभे राहणारे हे बाइकस्वार उपवन परिसरात फिरायला येणाऱ्या मुलींची छेडछाड करतात. ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी मोठय़ा प्रमाणात मुलींना त्रास देण्याचे तसेच अश्लील शेरेबाजी करण्याचे प्रकार या परिसरात घडले.  
– प्रथमेश वायदंडे, स्थानिक रहिवासी

बाइकर्सच्या कसरती
* व्हिली : महापौर बंगल्यासमोरील वळणावरून पुन्हा पायलादेवी मंदिराकडे जाताना ९० अंश कोनात दुचाकी मागच्या चाकावर उभी करणे.
* स्टॉपी : जलद वेगात येऊन दुचाकी जागीच थांबवणे.
* ३६० कोनात मोटरसायकल जागच्या जागी फिरवणे.
* झिकझॅक : सुसाट वेगात वेडीवाकडी दुचाकी चालवणे.
* चालू मोटरसायकलच्या सीटवर हात सोडून उभे राहणे, चालत्या मोटारसायकलवरून उतरून घसरत पुढे जाणे.
विनित जांगळे, ठाणे</strong>