२७ गावांमध्ये प्रभाव, मुरबाडमध्ये निर्विवाद सत्ता

शहरी भागातला मध्यमवर्गीयांचा पक्ष ही आपली मर्यादा ओलांडून भाजपने नागरीकरणाचे वेध लागलेल्या ग्रामीण भागातही प्रभाव पाडण्यास सुरुवात केल्याचे या निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. कल्याणमधील २७ गावांमध्ये सेनेला चीतपट करून भाजपने मुरबाड नगरपंचायतीमध्ये निर्विवाद बहुमत मिळविले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ४२ जागा मिळवून मोठे यश मिळविणाऱ्या भाजपने मुरबाड नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत १७ पैकी ११ जागा जिंकून निर्विवाद यश मिळविले आहे. एका जागी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेला तीन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांना या यशाचे शिल्पकार मानले जात आहे. या निवडणुकीत सेनेचे अर्जुन शेळके यांच्यासह राष्ट्रवादीचे हरीश पुरोहित, मुरबाड शिवसेना शहरप्रमुख राम दुधाळे आदींचा पराभव झाला.

एप्रिल महिन्यात अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये शिवसेनेशी चांगली झुंज देऊन चांगली कामगिरी केलेल्या भाजपने कल्याण-डोंबिवलीतही आपला तोच पवित्रा कायम ठेवला. बदलापूरमध्ये भाजपचे वीस, तर अंबरनाथमध्ये दहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महाालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची सारी सूत्रे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, नव्याने पक्षात आलेले गणपत गायकवाड आणि किसन कथोरे या चार आमदारांना भाजपने निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविले. निकालात त्याचे परिणाम दिसून आले. कल्याण तालुक्यातील २७ गावांमध्ये कार्यरत असलेल्या संघर्ष समितीमार्फत भाजपने त्या भागात शिरकाव करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचबरोबर मुरबाड नगरपंचायतीतही निर्विवाद यश मिळवून भाजपने ग्रामीण भागात प्रवेश केला आहे.