कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपचे विकास म्हात्रे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे विकास म्हात्रे यांनी काँग्रेस आणि मनसेच्या मदतीने विजय मिळवून सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. काँग्रेस आणि मनसेने भाजपला मदत केल्यामुळे निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ समसमान झाले होते. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेनेचा एक सदस्य आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे आठ, भाजपचे सहा, मनसे आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे गणेश कोट तर भाजपतर्फे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. स्थायी समितीमध्ये बहुमत असल्यामुळे ही निवडणूक जिंकू असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना होता. तर दुसरीकडे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मात्र विजयासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती. या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी आमदार चव्हाण यांनी काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांना गळाला लावून त्यांच्यासोबत आघाडी केली. भाजप, काँग्रेस आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने त्यांचे संख्याबळ आठ इतके झाले. तर शिवसेनेकडेही आठ संख्याबळ होते. समसमान संख्याबळ झाल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती. त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे हे निवडणुकीला गैरहजर राहिल्याने भाजपचे विकास म्हात्रे हे विजयी झाले. तर महापालिकेत सत्ता आणि स्थायी समितीत बहुमत असतानाही शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले.

शिवसेनेचा सदस्य गैरहजर

शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापती पद पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांना देण्याचा शब्द दिला होता. मात्र, शिवसेना नेत्यांनी तो शब्द पाळला नाही. यातूनच तर त्यांनी हा प्रकार केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संदर्भात वामन म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, आजारी असल्याचे आधीच पालिका आणि शिवसेना नेत्यांना कळविले होते. तसेच खूपच आजारी असल्यामुळे मतदानासाठी जाऊ शकलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर स्थायी निवडणुकीसाठी अनुपस्थितीत राहिल्याने वामन म्हात्रे यांच्यावर पक्ष कारवाई करील, अशी प्रतिक्रिया कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.

शिवसेनेने काय गमावले? : स्थायी समिती सभापती पद भाजपला मिळाल्याने परिवहन समिती सभापतीपद, उपमहापौरपद शिवसेनेने गमावले आहे. परिवहन समितीत सेना-भाजपचे सहा-सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापतीला तेथे मतदानाचा अधिकार असल्याने परिवहनमध्ये भाजपचा सभापती निवडून येईल. सध्या उपमहापौरपद भाजपकडे आहे. ते सोडण्यास भाजप आता नकार देणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.

मनसेबरोबर छुपी युती : कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असतो. राज्यातील मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील हे शिवसेना उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहेत. यातूनच आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेने भाजपसोबत छुपी युती करावी अशा चर्चेने जोर धरला आहे. या दरम्यान स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला उघडपणे मदत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सत्याचा विजय – रवींद्र चव्हाण

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. पालिका निवडणुकीसाठी नऊ महिने शिल्लक आहेत. या शेवटच्या वर्षांत महापौरपद भाजपला देण्यात येणार होते. असे असले तरी महापौरपद शिवसेनेकडेच ठेवावे आणि त्या बदल्यात स्थायी समितीपद भाजपला द्यावे, अशी मागणी भाजपने शिवसेनेकडे केली होती. तो प्रस्ताव शिवसेना नेत्यांनी फेटाळला होता. सेनेकडून सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याने स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शेवटी सत्याचा विजय होतो. त्याप्रमाणे आमच्या उमेदवाराचा विजय झाला, असे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीनिमित्ताने उल्हासनगर महापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.