बोगस डॉक्टरांना कंपन्यांकडून बेकायदा पुरवठा केला जात असल्याचा संशय; ठाणे पोलिसांकडून तपास सुरू

ठाणे : ठाण्याच्या अंतर्गत भागांसह कळवा, मुंब्रा, दिवा या उपनगरांत दवाखाने थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यातच या बोगस डॉक्टरांना औषध कंपन्यांकडूनच बेकायदा औषधपुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. ठाणे पोलिसांनी अलीकडेच दहा बोगस डॉक्टरांना अटक केल्यानंतर त्यांना होणाऱ्या औषधपुरवठय़ाचीही चौकशी करण्यात येत आहे.

कळवा आणि मुंब्रा भागांत काही बोगस डॉक्टर दवाखाने थाटून व्यवसाय करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या संस्थेला मिळाली होती. ही माहिती कौन्सिलने डॉक्टरांच्या नावासह ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागालाही दिली होती. त्यानंतरही महापालिकेने या बोगस डॉक्टरांविरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती, अशा तक्रारी आहेत. आठवडय़ाभरापूर्वी ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखा आणि शीळ डायघर पोलिसांनी कळवा मुंब्रा भागात बोगस डॉक्टरांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी त्यांच्याकडून औषधांचा मोठा साठा जप्त केला होता. यात इंजेक्शन, सलाइन यांचाही सामावेश होता. या औषधांचा काळाबाजार होत असल्याचा गंभीर प्रकार यानिमित्ताने पुढे येऊ लागल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नियमानुसार एखाद्या डॉक्टरला औषधांचा साठा पुरवण्याचे काम औषध कंपन्यांकडून करण्यात येत असते. त्यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी नेमण्यात येत असतात. या कंपन्यांकडून डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी केल्याखेरीज डॉक्टरांना औषधे पुरवली जात नाही. मात्र, या बोगस डॉक्टरांकडे या औषधांचा साठा आढळून आला. त्यांच्याकडे या औषध कंपन्यांचे प्रतिनिधी ही औषधे पुरवत होते का, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार आता पोलीस अधिकारी या कंपन्यांना पत्र पाठविण्याच्या तयारीत आहे. या कारवाईमुळे औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र कौन्सिलचा आरोप

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष आशुतोष गुप्ता यांनी बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटासाठी ठाणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ‘बोगस डॉक्टरांची माहिती देऊनसुद्धा महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला पोलिसांचे दार ठोठावे लागले. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे,’ असे गुप्ता यांनी सांगितले. पोलिसांनी औषधांचा बेकायदा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेतल्यास बोगस डॉक्टरांची साखळी नष्ट होऊ शकते, असा विश्वासही गुप्ता यांनी व्यक्त केला.