डोंबिवलीमध्ये पाणीटंचाईच्या सावटात बेकायदा बांधकामांना ऊत
पावसाचे प्रमाण या वेळी घटले आहे. बारवी धरण पुरेसे भरले नाही. कोणत्याही क्षणी पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीचे धोरण जाहीर झाले तर कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. अशी पाण्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना, डोंबिवली पूर्वेतील आयरे, कोपर पूर्व आणि भोपर भागात खारफुटी तोडून भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा धंदा सुरूच ठेवला आहे. धक्कादायक म्हणजे या चाळींच्या बांधकामांसाठी पालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून पाणीपुरवठा घेण्यात येत आहे. याच पट्टय़ातील नांदिवली, गांधीनगर, आयरे पट्टय़ातील रहिवासी पाणीटंचाईने हैराण आहेत.आयरे, कोपर, तुकारामनगर या भागांतून निवासी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने जलवाहिन्या टाकल्या आहेत. भूमाफियांनी चाळींच्या बांधकामांना पाणी लागते म्हणून या भागातील जलवाहिन्यांवरून चोरून नळजोडण्या घेतल्या आहेत. याच जलवाहिन्या नंतर चाळीत रहिवासी राहण्यास आले की सार्वजनिक ठिकाणी नळकोंडाळा (स्टॅण्ड पोस्ट) करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ‘ग’ प्रभागाच्या अंतर्गत आयरे, कोपर पूर्व, भोपर भाग येतो, तरीही या प्रभागातील अधिकारी या बेकायदा चाळी, तेथील बेकायदा नळजोडण्यांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत.बेकायदा चाळींना पुरेशा दाबाने पाणी यावे म्हणून चोरीच्या जलवाहिन्यांना दोन ते तीन ठिकाणी चार ते पाच बुस्टर लावून पाणी खेचले जाते. आयरे गाव, तुकारामनगर, सुनीलनगर, सागाव, नांदिवली, गांधीनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी परिसराला जो पालिकेकडून दररोजचा पाणीपुरवठा होतो, त्यामधील निम्मे पाणी आयरे, भोपर पट्टय़ातील भूमाफिया चोरून नेत आहेत. या भागात गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईची ओरड सुरू आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांत पालिका हद्दीत सुमारे २० ते २५ हजार बेकायदा नळजोडण्या घेऊन भूमाफियांनी पालिकेची पाणी चोरी सुरू ठेवली आहे. या माध्यमातून पालिकेचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशा तक्रारी गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे प्रशासनाकडे करीत आहेत. पण त्याची दखल भूमाफियांची पाठराखण करणारे प्रशासन घेत नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले.
चाळ बांधकामाचे गणि
आयरे, भोपर, कोपर पूर्व भागात बारा खोल्यांची एक चाळ बांधली जाते. एक चाळ निकृष्ट सिमेंट, विटा वापरून कमी मजुरीत पाच ते सहा लाख रुपयांमध्ये बांधली जाते. या चाळीतील एक खोली सुमारे ३ ते ४ लाख रुपयांपर्यंत ग्राहकाला विकली जाते. अशा प्रकारे एका चाळीच्या बांधकामातून भूमाफिया ३० ते ४० लाख रुपये मिळवतो. या भूमाफियांना या भागातील नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक गावगुंड पडद्यामागून मदत करीत असतात. एका खोलीमागे भूमाफिया दलालाला (मध्यस्थ) ३० ते ३४ हजार रुपये हप्ता देतो. हा दौलतजादा मध्यस्थामार्फत पालिकेच्या पायऱ्या चढतो. आणि योग्य ठिकाणी पोहोचतो, असे या भागातील भूमाफियांकडून सांगण्यात येते. त्यामुळे आमच्याविरुद्ध कोणी कितीही तक्रारी केल्या तरी पालिका अधिकारी, कर्मचारी आमच्या बांधकामांकडे फिरकत नाहीत, असे भूमाफियांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अशीच बेकायदा चाळींची बांधकामे टिटवाळा, कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, काटेमानिवली, डोंबिवली पश्चिमेत रेतीबंदर, खाडीकिनारा भागात सुरू आहेत.
पाणी परीक्षणाची टाळाटाळ
भगवान मंडलिक, कल्याणकल्याण डोंबिवली शहराला दररोज सुमारे ३०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठय़ातून सुमारे २५ टक्के पाणी गळती होते. शहरातील ३० ते ३५ हजार चाळी, इमारतींमधील बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जातो. पाणीवापराचे परीक्षण करण्याची अनेक वर्षांपासूनची काही जागरूक लोकप्रतिनिधींची मागणी पाणीपुरवठा विभाग आणि प्रशासनाने कधीच गांभीर्याने घेतली नाही. पाण्याचे परीक्षण केले तर अधिकाऱ्यांचे भूमाफिया, गावगुंड, लोकप्रतिनिधींशी असलेले लागेबांधे उघड होऊन त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.
बारवीत ६६ टक्के पाणीसाठा
बारवी धरणात शुक्रवापर्यंत ६१.५० मीटर पाण्याची पातळी (लेव्हल) आहे. पूर्ण क्षमतेत ही पातळी ६५.७० मीटर आहे. बारवीची एकूण पाणी साठवण क्षमता १८० दशलक्ष लिटर आहे. आज घडीला धरणात ११९ दशलक्ष लिटर साठा आहे. एकूण पाणीसाठय़ाच्या ६६ टक्के साठा धरणात आहे.

आयरे, भोपर, कोपर भागातील नवीन चाळींची पाच ते सहा बेकायदा बांधकामे दोन दिवसांपूर्वी तोडली. या भागात उभ्या राहत असलेल्या बेकायदा चाळी तोडण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे या भागातील सर्व चाळी जमीनदोस्त केल्या जातील. मनुष्यबळ अपुरे असल्याने या भागात कारवाई करताना अडचणी येत आहेत.

– मधुकर शिंदे, ग प्रभाग अधिकारी

आयरे, कोपर भागात पालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून जोडण्या घेण्यात आल्या असतील, तर त्या तोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आपण आजच देत आहोत.

– तरुण जुनेजा,प्रभारी कार्यकारी अभियंता