भाईंदर : मीरा-भाईंदर क्षेत्रातील चेना या आदिवासी पाडय़ात असलेल्या चेना नदीवर पूल आणि बंधाऱ्याच्या निर्मितीकरिता राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. याकरिता राज्य सरकार ३० कोटी रुपये खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यात ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

कशिमीरा ते ठाणे मार्गावर मुख्य रस्त्यात असलेल्या चेना नदीवर पुल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. जलसंपदा विभागाने सव्‍‌र्हे करून येथे पूल, बंधारा बांधण्याचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार जवळच २ एमएलडी पाणी साठवू शकेल इतक्या क्षमतेची साठवण टाकी मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून बांधली जाणार आहे. यामुळे नदीतील शुद्ध पाणी अडवून ते पाणी जवळच्या पाण्याच्या साठवण टाकीत साठवले जाणार आहे. तसेच पाण्याची वितरण व्यवस्थाही महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल. त्यानंतर शहराला हे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाईल. चेना नदीच्या माध्यमातून शहराला किमान ५ एमएलडी पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यानुसार चेना नदीवरील पूल बांधकाम कामासाठी एकूण ३० कोटींच्या खर्चाला सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून या प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.