छत्र्यांच्या गर्दीतून वाट काढताना ठाणे स्थानकात प्रवाशांची तारांबळ

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर छत नसल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उन्हाचा मारा झेलत मुकाटपणे पूल ओलांडणाऱ्या प्रवाशांची पावसाळ्याच्या दिवसांत मात्र तारांबळ उडत आहे. या पुलावरील दिवेही बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी येथून जाणे महिला प्रवाशांसाठी जिकिरीचे बनले आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून कोपरी पूर्व भागात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी येथे पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली. सद्य:स्थितीत कोपरी भागात जाण्यासाठी दोन पादचारी पूल आहेत. यांपैकी फलाट क्रमांक दोनच्या टोकाला असलेल्या पुलावर महापालिकेने आजतागायत छत उभारलेले नाही.  छप्पर नसल्यामुळे पादचाऱ्यांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. तसेच या पुलावर दिव्यांची संख्या फार कमी आहे. काही दिवे हे बंद अवस्थेत आहेत, तर काही दिवे हे सकाळच्या वेळी सुरू असतात. बंद दिव्यांमुळे रात्री पुलावर काळोख असतो. त्यामुळे या पुलावरून एकटय़ाने रात्रीच्या वेळेस प्रवास करणे हे भीतिदायक असल्याचे कोपरी भागात राहाणाऱ्या महिला प्रवाशांनी सांगितले.

सकाळच्या वेळेस या पुलावर काही फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांनी हा संपूर्ण पादचारी पूल व्यापून जातो. अनेकदा पोलिसांकडून आणि महापालिकेकडून या फेरीवाल्यांवर कारवाई होते. मात्र फेरीवाले पुन्हा अवतीर्ण होतात. पूर्व आणि पश्चिमकडे जाणाऱ्या पुलाची जबाबदारी महापालिकेची आहे, असे स्थानक प्रबंधकांचे म्हणणे आहे. या विषयी महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. या पुलाचे बांधकाम महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पुलावर छत बसवायची जबाबदारी महापालिकेची आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानकाचे प्रबंधक महिंदर सिंग यांनी दिली.