रस्तारुंदीकरणातील ८२१ बांधकामांवर कारवाई सुरू
कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी उल्हासनगर शहरातील ८२१ अतिक्रमणे हटवण्याची मोहीम उल्हासनगर पालिका प्रशासनाने शुक्रवारपासून सुरू केली. या अतिक्रमणांमध्ये टोलेजंग इमारती, बेकायदा गाळे यांचा समावेश होता. अतिक्रमणविरोधी पथकाला सुरुवातीला व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पण पोलीस बंदोबस्तामुळे त्यांचे काही चालले नाही. कल्याण-अंबरनाथ वाहतुकीस उपयुक्त ठरणारा हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून या अतिक्रमणांमुळे रखडला होता.

कल्याणहून थेट अंबरनाथ-कर्जत दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम ‘एमएमआरडीए’तर्फे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्याचे कर्जत, अंबरनाथ, कल्याण बाजूकडील काम पूर्ण होत आले आहे. या रस्त्यामुळे मुंबई किंवा अन्य शहरांतून येणारी वाहने कर्जत, अंबरनाथ, कल्याण दिशेकडे जाणारी असतील तर, ती वाहने शहरात न जाता शहराबाहेरून कर्जत दिशेकडे निघून जातील. अशी या रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. उल्हासनगर शहराच्या एका कोपऱ्यावरून (बाहेरून) हा रस्ता जाणार आहे. मात्र, या रस्त्य़ाच्या दुतर्फा बेकायदा इमारती, व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या इमारतीतील धनदांडग्या व्यापाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून आपल्यावरील कारवाई दोन वर्षे टाळली होती.

मात्र, आता पालिका प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून शुक्रवारपासून अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशानंतर उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी सकाळी एक ते दीड किमी अंतराच्या रस्त्यावरील सुमारे ८०० हून अधिक अतिक्रमणे  जमीनदोस्त केली. ही बांधकामे तुटल्याने रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे, असे साहाय्यक आयुक्त युवराज भदाणे यांनी सांगितले.

पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी कोणत्याही परिस्थितीत उल्हासनगर पट्टय़ातील कल्याण अंबरनाथ रस्त्याचे काम रखडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या रस्त्याला बाधीत होणारी उल्हासनगरमधील अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे आश्वासन शासनाला दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.