कुटुंबीयांचा आरोप;  वसईत ‘कॅण्डल मार्च’चे आयोजन

जमैका या देशात हत्या झालेल्या वसईतील तरुण राकेश तलरेजा याची हत्या पूर्वनियोजित होती, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. वसईच्या अंबाडी रोड येथे राहणाऱ्या या तरुणाची ९ फेब्रुवारी रोजी दरोडेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती.

वसईच्या ओमनगर येथे राहणारा राकेश तलरेजा जमैकाच्या किंग्जस्टन शहरातील एका सराफाच्या दुकानात सेल्समनचे काम करीत होता. दररोज तो मालकाच्या सांगण्यावरून शोरूममध्ये जमा झालेली रोकड सायंकाळी घरी नेत असे. लुटारूंना ही बाब माहीत असल्याने लुटीच्या उद्देशाने त्याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी वसई रोड भागात कॅण्डल मार्च काढण्यात आला. या वेळी स्थानिकांनी गर्दी करून कॅण्डल मार्चला प्रतिसाद दिला.

मृत राकेश तलरेजा याच्या कुटुंबीयांनी ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. जमैकाचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह संबंधितांशी पत्रव्यवहार करून या हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या एकूण प्रकरणात अनेक बाबी संशयास्पद असल्याचे सांगत राकेशच्या भावाने वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राकेशच्या मृत्यूनंतर त्याचे मालक, सहकारी तेथील एका स्थानिकांनी दिलेल्या माहितीमधील तफावतीकडे या पत्रांमध्ये लक्ष वेधण्यात आलेले आहे.

आम्हाला संशय आहे की ही हत्या पूर्वनियोजित होती. कारण त्याचे मित्र वेगवेगळी कारणे देत आहेत आणि मालक वेगळी कारणे देत आहेत. आम्हाला फक्त न्याय हवा असून या प्रकरणाातील सत्य जाणून घ्यायचे आहे.

-महेश तलरेजा, मृत राकेशचा मोठा भाऊ