मृत माणसाच्या हातातील सोन्याची अंगठी चोरल्याप्रकरणी खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर, नर्सचा समावेश आहे. भीका पाटील यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. त्यावेळी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी गायब झाली होती. भीका पाटील यांची मुलगी विजयश्री पाटीलने पाठपुरावा केल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि आणि नर्सविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी विजयश्री यांना ठाणे कोर्टात लढाई लढावी लागली तसेच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अनेक चकरा माराव्या लागल्या. भीका पाटील हे राबोडीवरुन धुळयाला जात होते. त्यावेळी ठाणे स्थानकातच त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. रेल्वे स्थानकातील डॉक्टरने तपासल्यानंतर त्यांना ठाण्यातील उत्तलसर नाक्यावरील रुग्णालयात नेण्यात आले.

ईसीजी काढल्यानंतर भीका पाटील यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात घेऊन जाण्यात आला. भीका यांच्या अंगावर २० ग्रॅमची सोन्याची चैन आणि हातात पाच ग्रॅमची अंगठी होती. त्यापैकी अंगठी गायब होती. हॉस्पिटलकडे याबद्दल विचारणा केली तेव्हा तिथून काही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यानंतर विजयश्री पोलीस स्थानकात गेल्या पण त्यांनी सुद्धा तक्रार नोंदवण्यास नकार दिला.

विजयश्री यांनी प्रयत्न करुन सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यामध्ये भीका पाटील यांना रुग्णालयात आणले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये सोन्याची अंगठी दिसत आहे. पोलीस तक्रार नोंदवत नसल्यामुळे विजयश्री यांनी कोर्टात धाव घेतली. तेव्हा कोर्टाने पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राबोडी पोलिसांनी डॉक्टर आणि नर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णाने अंगावर मौल्यवान गोष्टी घालू नये अशी सूचना हॉस्पिटलमधल्या फलकावर लिहिली आहे. कारण हॉस्पिटलमध्ये रोज अनेक लोक येत असतात असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.