भिवंडी, ठाणे ग्रामीण भागांतील केंद्रे मात्र सुरू

ठाणे : जिल्ह्य़ाला ३१ हजार २४० लशींचा साठा गुरूवारी उपलब्ध झाला असला तरी, हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांनी शुक्रवारी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी शहरात दोन तर, ग्रामीण भागात काही ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत.

लस तुटवडय़ाअभावी आणि हावामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्य़ातील लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती. गुरूवारी जिल्ह्य़ाला ३१ हजार २४० लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. परंतू, मुसळधार पावसामुळे ठाण्यापल्याडच्या शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमी वर  ठाणे, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांनी शुक्रवारी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी महापालिकेने लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून शहरात दोन ठिकाणी लसीकरण सुरू राहणार आहे.