उपनगरी सेवेच्या रखडपट्टीविरोधात आझाद मैदानात निदर्शने

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वे मार्गावर उपनगरीय लोकलच्या होणाऱ्या रखडपट्टीविरोधात रेल्वे प्रवासी संघटनांकडून मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवाशांना आझाद मैदानात जमा होण्याचे आवाहन प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून लोकल गाडय़ांचा वारंवार खोळंबा होत असल्यामुळे प्रवाशी हैराण आहेत. वारंवार रेल्वे सेवा विस्कळीत होणे, ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेची रखडलेली कामे, रेल्वे रूळ ओलांडून प्रवाशांचे होणारे अपघात अशा विविध विषयांसाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी आझाद मैदानात हे आंदोलन होणार असून या आंदोलनाविषयी रेल्वे प्रवाशांमध्येही प्रसार व्हावा आणि प्रवाशांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी सोमवारी रेल्वे प्रवासी संघटनांनी ठाणे, डोंबिवली, कसारा, वागंणी, कर्जत स्थानकांमध्ये पत्रके वाटली. तसेच प्रवाशांना काळ्या फिती बांधून प्रवास करण्याचीही विनंती केली.

आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान प्रवासी संघटनांचे सर्वच स्थानकांतील प्रतिनिधी उपस्थित राहतील. हे प्रतिनिधी प्रत्येक स्थानकात भेडसावणाऱ्या समस्या मांडतील. संघटनेची दोन शिष्टमंडळे तयार करण्यात आली असून यातील एक शिष्टमंडळ मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. तर, दुसरे शिष्टमंडळ राज्याच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे.