ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती; तसेच प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदाकरिता २८ एप्रिलला निवडणूक घेण्यात येणार असून त्यासाठी येत्या २७ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सदस्य संख्याबळ जास्त असल्यामुळे स्थायी समितीच्या चाव्या महायुतीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदावर वर्णी लागावी, याकरिता सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचा स्थायी समिती सभापतिपदाचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. तसेच स्थायी समितीमधून निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. असे असले तरी स्थायी समिती सभापतिपदाची खुर्ची मात्र रिकामी आहे. यामुळे स्थायी समितीच्या १६ सदस्यांमधून नवीन सभापतिपदाची निवड करण्यासाठी येत्या २८ एप्रिलला निवडणूक घेण्यात येणार असून त्यासाठी येत्या २७ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
स्थायी समितीत शिवसेनेचे ७, रिपाइंचा १, भाजपचा १, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेसचे २ आणि मनसेचा १ सदस्य आहेत. त्यापैकी काँग्रेसचे सदस्य दीपक वेतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यामुळे १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये महायुतीचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपद महायुतीच्या ताब्यात जाणार असल्याचे चित्र आहे. तसेच महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदाकरिताही येत्या २८ एप्रिलला निवडणूक घेण्यात येणार आहेत.

महायुतीचा वरचष्मा
अध्यक्ष पदाच्या उमेदवारीकरिता २७ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रभाग अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. दहापैकी कळवा, मुंब्रा वगळता उर्वरित आठ प्रभाग समित्यांवर महायुतीचे वर्चस्व आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांवर पुन्हा महायुतीचा वरचष्मा राहणार असल्याचे चित्र आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.