News Flash

ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा आधार हरपला

ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांचे निधन

ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांचे निधन

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे भारत सहकारी बँक, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, विद्या प्रसारक मंडळ अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ठाण्यातील बँकिंग, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे साहित्यप्रेमी माधव यशवंत गोखले यांचे सोमवारी सकाळी ११ वाजता निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘शहराच्या वाचन चळवळीपासून पाडव्याच्या स्वागतयात्रांपर्यंतच्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींना आकार देणारा आधार हरपला,’ अशी प्रतिक्रिया गोखले यांच्या निधनावर व्यक्त होत आहे.

सरकारी नोकरी ते बांधकाम व्यावसायिक असा प्रवास करताना मा. य. गोखले यांनी ठाण्याच्या सामाजिक जडणघडणीला आकार देण्यात मोलाचा हातभार लावला. काही वर्षे ऑडिट जनरल कार्यालयात अधिकारी म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले व अल्पावधीतच उत्तम बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आले. वयाची साठी ओलांडल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली. कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना कायदेशीर तरतूद आणि तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी यांचा विचार करून पुढील आखणी करण्याचा स्वभावगुण नेहमीच वाखाणला जात असे.

गोखले हे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ठाणे शाखेचे माजी अध्यक्ष होते. मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. हे संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. गेली अनेक वर्षे ते ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सदस्य होते.

श्रद्धांजली

मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विश्वातील एक अग्रणी व चतुरस्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. सहकारी बँक कशी चालवावी, याचा मापदंड त्यांनी ठाणे भारत सहकारी बँकेच्या रूपाने निर्माण केला. ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वातही त्यांचे योगदान मोठे होते. ठाण्याच्या सर्वागीण विकासाशी आपल्या कर्तृत्वाने नाळ जोडलेले मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याची व ठाणेकरांची अपरिमित हानी झाली आहे.

एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा

ठाणे शहरातील बँकिंग, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य वर्तुळातील एक आदरार्थी नाव म्हणजे मा. य. गोखले. ते खऱ्या अर्थाने ठाण्याचे ‘माय गोखले’ होते. त्यांच्याविषयी ठाणेकरांना आपुलकी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे भारत सहकारी बँकेने नेहमीच सचोटीने व्यवसाय करून बँकिंग क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले आहे.  गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– निरंजन डावखरे, आमदार व जिल्हाध्यक्ष, भाजप

आधुनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती समृद्ध करण्याच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना सातत्याने पाठबळ देणारे ‘मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे’चे चिरतरुण नेतृत्व हरपले.

विद्याधर वालावलकर, अध्यक्ष, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2020 2:25 am

Web Title: chairman of thane bharat sahakari bank m y gokhale passes away zws 70
Next Stories
1 भाजी बाजारात पुन्हा उसळी
2 मद्यपी वाहनचालकाचे सहप्रवासीही दंडपात्र
3 टाटा आमंत्रा करोना काळजी केंद्र बंद होणार 
Just Now!
X