वाहन कर्ज काढून नंतर हप्ते न फेडताच परागंदा झालेल्या २० कर्जदारांनी बदलापूर पूर्व येथील बँक ऑफ महाराष्ट्रला तब्बल दोन कोटी ४१ लाख ३७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या सर्व कर्जदारांची शिफारस एकाच व्यक्तीने केल्याचे निष्पन्न झाल्याने यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. या व्यक्तीसह अन्य २० जणांविरोधात बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पूर्व येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १० डिसेंबर २०१२ ते ८ मार्च २०१३ या कालावधीत २० जणांनी बँकेत खाते उघडले होते. त्यानंतर या २० जणांनी बँकेत वाहन कर्जासाठी एकत्ररीत्या अर्ज केले. या सर्वाची शिफारस हरी राव नावाच्या इसमाने बँकेकडे केली होती. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच जामीनदार मिळाल्यानंतर सर्व बाबींची रीतसर पडताळणी करून बँकेने या साऱ्यांना वाहनकर्ज दिले. कर्जदारांनी मोटर वाहन डीलरकडून वाहन घेतल्याची कागदपत्रेही बँकेत सादर केली. मात्र, सुरुवातीचे एक दोन हप्ते भरल्यानंतर या कर्जदारांनी हफ्ते फेडणे बंद केले. बँकेचे अधिकारी वसूलीसाठी गेले असता, कर्जदार हे राहत्या पत्त्यावरून सोडून गेल्याचे बँकेला समजले. कर्जदारांनी ज्या वाहन विक्रेत्याकडून गाडय़ा खरेदी केल्या होत्या ते शोरूमही बंद झाल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता कर्जदारांनी ज्या गाडय़ांची कागदपत्रे सादर केली होती, त्या गाडय़ांच्या क्रमांकाची परिवहन विभागाकडेही नोंद नसल्याचे चौकशीत उघड झाले. बँकेच्या व्यवस्थापक वासंती नायर यांच्या तक्रारीनंतर कर्जदारांची शिफारस करणाऱ्या हरी राव याच्यासह अन्य २० जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.