News Flash

रासायनिक सांडपाणी नाल्यावाटे नदीत

रात्रीपासून ही वाहिनी फुटल्याची माहिती स्थानिक देत असले तरी हे पाणी थेट नाल्यात मिसळले आहे.

रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी मंगळवारी पुन्हा फुटल्याने हजारो लिटर रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात मिसळले गेले.

एमआयडीसीची वाहिनी फुटल्याने उल्हास नदी प्रदूषित

गेल्या काही वर्षांपासून वारंवार गळती होणारी एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी मंगळवारी पुन्हा फुटल्याने हजारो लिटर रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात मिसळले गेले. नाल्यातून हे पाणी थेट उल्हास नदीत गेल्याने उल्हास नदी पुन्हा एकदा प्रदूषित झाली आहे. या वाहिनीच्या सातत्याने फुटण्याने आसपासच्या नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रासाला समोरे जावे लागत आहे.

अंबरनाथ बदलापुरात जल आणि वायुप्रदूषणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अपयश येत आहे. बदलापूरच्या औद्योगिकवसाहतीतील कंपन्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी चिखलोली येथील प्रक्रिया प्रकल्पात नेले जाते. कर्जत महामार्गाशेजारून ही वाहिनी जाते. मात्र या वाहिनीत होणाऱ्या कमी-अधिक दबावामुळे अनेकदा ही वाहिनी फुटून त्यातील रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आल्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधीला सामोरे जावे लागते आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून बदलापुरातील पूर्व भागात अशाच प्रकारे रासायनिक वायूमुळे नागरिकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्यातच मंगळवारी सकाळी रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने त्याचे पाणी थेट नाल्यात जाऊन मिसळत होते. गेल्या काही दिवसांपासून ही वाहिनी सातत्याने फुटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यावर एमआयडीसीकडून तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र पूर्वेतील वखार ते नाला अशा पट्टय़ात सातत्याने ही वाहिनी फुटत असल्याने यावर कायमचा उपाय शोधण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.

रात्रीपासून ही वाहिनी फुटल्याची माहिती स्थानिक देत असले तरी हे पाणी थेट नाल्यात मिसळले आहे. हाच नाला उल्हास नदीला मिळतो. या नाल्यातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यात उल्हास नदीचे पाणी पुढे जांभूळ, शहाड येथे पिण्यासाठी उचलले जाते. त्यामुळे या रासायनिक पाण्याचा फटका पुढील नागरिकांना बसण्याची शक्यताही आता व्यक्त केली जाते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:49 am

Web Title: chemical wastewater drop in river through drainage in badlapur
Next Stories
1 अंबरनाथमध्येही शिवसेनाच
2 एसटीच्या मार्गावर पालिकेची बससेवा
3 पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घसरली!
Just Now!
X