स्थानिक लोकप्रतिनिधींची पाणीपुरवठामंत्र्यांकडे धाव

अंबरनाथ : नागरिकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी १० ऑक्टोबरपासून अंबरनाथ पूर्वेतील बहुतांश भागांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिखलोली धरणातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची नुकतीच भेट घेतली.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बदलापूर शहराची तहान उल्हास नदीवरील असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून भागवली जाते, तर अंबरनाथ शहराला जीवन प्राधिकरण, चिखलोली धरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा होतो. अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र चिखलोली धरण आहे. मार्च महिन्यात या धरणातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात हे धरण भरून वाहू लागले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिना येईपर्यंत या धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या वतीने या धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑक्टोबरपासून या धरणातून अंबरनाथ पूर्वेतील विविध भागांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या धरणातून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. या पाण्यात दूषित घटक इतके असतात की घरगुती जलशुद्धीकरण उपकरणेही त्यामुळे बंद पडत आहेत.

वडवली, शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कृष्णनगर या भागातील नागरिकांनी गेले सहा महिने एक दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तहान भागवली. गेल्या १५ दिवसांपासून दररोज पाणीपुरवठा होत आहे. मात्र दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे एक दिवसाआडच पाणी द्या ,पण शुद्ध द्या, अशी मागणी नागरिक करत आहेत.