20 November 2017

News Flash

वसईतील ख्रिस्तायण : वसईतील ख्रिस्ती संस्कृतीची ओळख

वसईची ओळख आजही इतर गोष्टींप्रमाणे तेथील वैशिष्टय़पूर्ण ख्रिस्ती समाजही आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 18, 2017 2:34 AM

वसईतील ख्रिस्ती समाज,

वसईतील ख्रिस्ती समाज, संस्कृती, विविध परंपरा, सण-उत्सव, बोलीभाषा आदींवर प्रकाशझोत टाकणारे नवे सदर..

वसई.. मुंबईच्या वेशीवरील निसर्गरम्य शहर. अनेक छोटय़ा गावांनी मिळून तयार झालेल्या या शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. पश्चिमेकडे अथांग निळाशार समुद्र, हिरवीगार वनराई असलेल्या या परिसरातील संस्कृती आजही आपले वैशिष्टय़े टिकवून आहेत. आगरी, कोळी, वाडवळ, भंडारी, पानमाळी आदी विविध समाजांबरोबर इथला प्रमुख समाज म्हणजे ख्रिस्ती समाज होय.

वसईची ओळख आजही इतर गोष्टींप्रमाणे तेथील वैशिष्टय़पूर्ण ख्रिस्ती समाजही आहे. वसईत धर्मातरित होऊन ख्रिस्ती झाले तरी त्यांची नाळ या मातीशी, संस्कृतीशी आजही कायम आहे. वसईत ख्रिस्ती समाज प्राचीन काळापासून आहे. साधारणत: ५०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज येथे आल्यानंतर हा समाज अगदी ठळकपणे दिसू लागला. त्यांनी आपल्या मातीला धरून नव्या संस्कृतीचा स्वीकार केला. येथे कुपारी, वाडवळ, ईस्ट इंडियन आणि कोळी हे चार प्रमुख ख्रिस्ती समाज आहेत. उत्तर वसई आणि दक्षिण वसई असे त्याचे दोन भाग आहेत. वसईतील पोर्तुगिजांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे येथील ख्रिस्ती समाजावर त्यांच्या संस्कृतीची छाया आणि खुणा दिसून येतात.

वसईतील ख्रिस्ती समाज हा मराठमोळा आणि शिक्षित समाज. या ख्रिस्ती समाजाची संस्कृती, परंपरा सर्वार्थाने वेगळे आहेत. त्यांची बोलीभाषा, पेहराव, साहित्य संस्कृती, वास्तूकला, खाद्यसंस्कृती, महोत्सव, सण सोहळे सारेच वेगळे आणि पारंपरिक आणि अनोख्या संस्कृतीची झलक दर्शवते. वसईतील पुरातन चर्च प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना दाखवत आजही दिमाखात उभी आहेत. वसईच्या शिक्षणप्रसारात ख्रिस्ती संस्थांचे योगदान सर्वात मोठे आहे. येथील स्थानिक ख्रिस्ती सर्वच क्षेत्रांत कार्यरत. स्थानिक शेतकरी, मजूर, कामगार, तंत्रज्ञ, शिक्षक, सहकार, शिक्षण, धर्म, चळवळ आदी प्रत्येक क्षेत्रामध्ये हा समाज आहे. काळानुरूप होणाऱ्या स्थित्यंतरात समाज बदलत गेला, पण त्यांची संस्कृती, परंपरा आजही कायम राहिली आहे. शांतताप्रिय समाज आपल्या न्यायहक्कासाठी, वसईच्या रक्षणासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरला आहे. पाण्यासाठी संघर्ष असो की अलीकडील गावे वाचवण्याचे आंदोलन असो. हा समाजाचे लढवय्यी वृत्ती दिसून येत आहे. मराठी साहित्यात ख्रिस्ती साहित्यिकांचे अमूल्य योगदान आहे. ख्रिस्ती बोलीभाषेच्या गोडव्याबरोबर त्याची साहित्यिक प्रतिभा आता समोर येऊ  लागली आहे. म्हणून ख्रिस्ती बोलीभाषा आता शालेय तसेय मुंबई विद्यपीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ  लागला आहे.

हा समाज नेमका आहे कसा, त्यांचा उदय झाला कसा, काय आहे त्यांची संस्कृती, कशी आहे त्यांची परंपरा याचा वेध या नव्या सदरातून घेणार आहोत. ख्रिस्ती संत, त्यांचे धार्मिक विधी, त्यांची कुटुंबरचना, त्यांची बोलीभाषा, त्यांचे साहित्य पुराण, पोशाख, संगीत, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान, लोकगीते, सण, कुटुंब रचना, वाइनचे म्हत्त्व, त्यांचे मराठीपण, त्यांच्या आडनावांचा इतिहास, ख्रिस्ती साहित्यिका आदींवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

First Published on July 18, 2017 2:34 am

Web Title: christian cultural identity in vasai