जिल्ह्यात २८ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण; केवळ सात लाख नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत २८ लाख २२ हजार ४७६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून यापैकी केवळ सात लाख १६ हजार ५९० नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत. अनेक नागरिकांची दुसरी मात्रा घेण्याची कालमर्यादा संपत आली असली तरी त्यांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. लशीच्या तुटवडय़ामुळे आठवडय़ातून दोन ते तीन दिवसच लसीकरण केंद्रे सुरू राहत असून या दिवशीही ठरावीक लशीच्या मात्रा उपलब्ध असतात. त्यामुळे वणवण फिरूनही लस मिळत नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे.

जुलै महिन्यात लस तुटवडय़ामुळे जिल्ह्य़ातील लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे. लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाला आठवडय़ातून दोन ते तीन दिवसच लसीकरण केंद्रे सुरू ठेवावी लागत आहेत. त्यातही शहरांमधील सर्व केंद्रे सुरू ठेवली जात नाहीत. निम्म्याहून अधिक केंद्रे बंदच असतात. एका केंद्रावर दिवसाला दोनशे ते अडीचशे नागरिकांना लस देण्याचे नियोजन आखले जाते. अनेक केंद्रांवर पूर्वनोंदणीविनाच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांच्या केंद्राबाहेर रांगा लागत आहेत. कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेऊन ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. हे नागरिक दुसरी मात्रा घेण्यासाठी केंद्रांवर येत असून यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची पुन्हा गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत केंद्रांवर लशींचा साठा पुरेसा नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत २८ लाख २२ हजार ४७६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी केवळ सात लाख १६ हजार ५९० नागरिकांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्य़ात ४५ वर्षांपूढील १५ लाख ९६ हजार ६१६ जणांनी कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतली असून यापैकी ५ लाख ८० हजार ३१५ नागरिकांचे दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. तर, १ लाख ३३ हजार ३७४ नागरिकांनी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतली असून त्यापैकी ९५ हजार ९१३ नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर, १८ ते ४४ वयोगटातील ३ लाख ७५ हजार ८९६ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून त्यापैकी ४० हजार ३६२ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

जुलै महिन्यात लशीच्या तुटवडय़ाअभावी आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील अनेक केंद्रे आठवडाभर बंद ठेवण्यात आली होती. तसेच इतर आठवडय़ातही अवघे दोन ते तीन दिवसच लसीकरण सुरू होते. यामुळे या महिन्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्य़ातील लसीकरण

शहर    पहिला दुसरा

ठाणे    ५,०४,७५४   १,७०,६२६

कल्याण- डोंबिवली    ३,५३,३०६   १,१७,७२४

उल्हासनगर  ८९,७३० २०,३३८

भिवंडी  १,११,९९३   २५,९६८

मीरा भाईंदर २,६४,१४२   १,१६,३७४

नवी मुंबई   ३,५७,२४२   १,५५,९१९

ठाणे ग्रामीण ४,२४,७१९   १,०९,६४१

एकूण   २१,०५,८८६  ७,१६,५९०