नव्या वर्षांत सी.के.नायडू करंडक स्पर्धेतील सामन्याचे आयोजन

ठाणे : ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलामध्ये वर्षभरापूर्वी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट खेळपट्टीवर मध्यंतरी आयपीएल संघातील खेळाडूंनी सराव केला. यापाठोपाठ आता याठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सी.के.नायडू करंडक स्पर्धेतील मुंबई विरुद्ध बंगाल या संघांचा सामना खेळविला जाणार आहे. या संकुलामध्ये २२ वर्षांपूर्वी रणजी करंडक स्पर्धेतील क्रिकेट सामने झाले होते. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारच्या मोठय़ा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन याठिकाणी होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात १९९७ रणजी करंडक सामना खेळविण्यात आला होता. त्यानंतर याठिकाणी एकही मोठय़ा क्रिकेट स्पर्धेचा सामना झाला नव्हता. त्यामुळे महापालिकेचा पांढरा हत्ती म्हणून क्रीडा संकुलाची ओळख निर्माण झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नदीम मेमन यांच्या मदतीने वर्षभरापूर्वी क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्यात आले. या मैदानामध्ये एक मुख्य खेळपट्टी आणि सरावासाठी तीन खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच मैदानामध्ये ऑस्ट्रेलियातील बरमुडा गवताचे रोपण करण्यात आले असून त्याचबरोबर मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी ७२ भूमिगत फवारे बसविण्यात आले आहेत. या मैदानामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सी.के.नायडू करंडक स्पर्धेतील मुंबई विरुद्ध बंगाल या संघांचा सामना खेळविला जाणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी महापालिका मुख्यालयात सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महापौर नरेश म्हस्के, आयुक्त संजीव जयस्वाल, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नदीम मेमन यांच्यासह महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पालिकेलाही उत्पन्न

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सी.के.नायडू करंडक स्पर्धेतील मुंबई विरुद्ध बंगाल या संघांचा सामना दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात होणार असून त्याचा संपूर्ण खर्च हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून केला जाणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या निमित्ताने महापालिकेला मैदानाच्या भाडय़ातून उत्पन्नही मिळणार आहे. असे असले तरी या सामान्यादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्याठिकाणी व्यवस्था कशी असावी याबाबत महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वीही मातब्बर खेळाडूंची खेळी

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलामध्ये यापूर्वी विविध स्पर्धेच्या निमित्ताने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासह वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ऑलवीन कालीचरण, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, संदीप पाटील, अंशुमन गायकवाड, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री, मोहम्मद अझरउद्दीन हे क्रिकेटपटू खेळले आहेत.

मुंबई विरुद्ध बंगाल सामना

ठाणे महापालिका आणि मुंबई क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंमध्ये चार दिवसीय मुंबई विरुद्ध बंगाल हा सामना होणार आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत हा सामना होणार आहे. हा सामना शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना पाहता यावा यासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.