ज्याच्या मार्गदर्शनाखाली आणि आधाराने आपली क्षितिजे प्रत्येक विद्यार्थी विस्तारत असतो, आपल्या त्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस. महाविद्यालयात वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमा साजरी केली.

ठाण्यातील महाविद्यालयांतील गुरुपौर्णिमा

गुरूला वंदन करण्याचा दिवस. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिशा दाखवणारा, काय चांगले-वाईट आहे हे सांगणारा, तसेच आपली चूक झाली तर तेवढय़ाच हक्काने चूक दाखवणारे गुरू आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटतात. पहिले आई-वडील आणि नंतर आपले शिक्षक हे आपल्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. महाविद्यालयीन जीवनात तर शिक्षक पहिले गुरू असतात. अशा गुरूंना वंदन करण्यासाठी ठाण्यातील विविध महाविद्यालयांत गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहाने तसेच वेगळ्या पद्धतीने साजरी केली.

ज्ञानसाधना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबाचे फूल आणि भेट कार्ड देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच जोशी-बेडेकर महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे द्वितीय वर्ष पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी गरुपौर्णिमेचे आयोजन केले होते. प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना घेऊन  हे विद्यार्थी गुरुपौर्णिमा साजरी करत असतात. संत साहित्यातील गुरू-शिष्य परंपरा अशी संकल्पना ठेवत या वर्षी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास या संतांच्या गुरूंविषयी व शिष्यांविषयी माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांनी तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. तसेच या कार्यक्रमात सरल हिंदी या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या शुभम पेडामकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ‘‘जसे चांगल्या शिष्याला एक चांगला गुरू हवा असतो त्याचप्रमाणे एका गुरूला एक चांगला शिष्य देखील हवा असतो,’’ असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी केले. उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना गंध लाऊन आणि हार घालून गुरुपौर्णिमा साजरी केली. अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वत: लिहिलेल्या कविता सादर केल्या. यावेळी गुरू-शिष्य ही आपली प्राचीन परंपरा असून आपण तिचे शाळा, महाविद्यालयात जतन केले पाहिजे, अशी मते विद्यार्थ्यांनी मांडली. आताच्या बदलत्या काळात शिक्षक विद्यर्थ्यांच्या बदलत्या नात्याबाबत पण आपली मते व्यक्त केली.

बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात ‘‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’’ आणि ‘‘आम्ही देशासाठी काय करू शकतो?’’ हे दोन विषय विद्यार्थ्यांना दिले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरती प्रकाशनचे सुरेश देशपांडे, लेखक प्रभाकर संत उपस्थित होते. एक सुजाण नागरिक बनून हक्क आणि कर्तव्ये बजावू आणि आम्ही आमच्या गुरूने दिलेला वसा पुढे चालवू तसेच देशासाठी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात प्रथम स्वत:पासून करू हे सांगितले. या कार्यक्रमात प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार तसेच रघुनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

आदर्शमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

बदलापूर येथील आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘अस्मिता’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात ठाण्यातील सुप्रसिद्ध विचारवंत व लेखिका संपदा वागळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैदेही दप्तरदार, डॉ.संदीप भेले,आणि डॉ.श्रद्धा सोमण उपस्थित होत्या.

संपदा वागळे यांनी ‘‘अशी माणसे असा आदर्श’’ यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्येक माणसाच्या डोळ्यापुढे कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श असतोच हे समजून सांगताना त्यांनी थोर व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांच्याकडून कोणता आदर्श घ्यावा याबद्दल सांगितले. आदर्श फक्त थोर व्यक्तीचा असायला पाहिजेच असे नाही, तर आपल्या आजूबाजूच्या माणसाकडून त्यातील चांगल्या गोष्टींचा आदर्श ठेवायला पाहिजे. कोणासाठी सचिन तेंडुलकर आदर्श असतो, तर कोणासाठी आई-वडील, तर कोणासाठी रोज काम करणारा हमाल पण असू शकतो. प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या आदर्शाची व्याख्या बदलते, असे त्यांनी सांगितले.

आदर्श महाविद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक वर्षी एक संकल्पना घेऊन त्यानुसार सर्व कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैदेही दप्तरदार यांनी ‘‘संवेदना’’ ही  संकल्पना कार्यक्रमात मांडली. यानुसार संपूर्ण वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मराठी वाङ्मय मंडळातर्फे तयार केलेले ‘‘अस्मिता’’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यावर्षी मराठी वाङ्मय मंडळातर्फे व्याख्याने, कवितांचे सादरीकरण, असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.

 

आदर्श महाविद्यालयात महिला सक्षमीकरणाचे धडे

प्रत्येक क्षेत्रात महिला स्वत:ला सिद्ध करतात. महिला सक्षमीकरणाबाबत जागरूकता व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला विकास मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे. बदलापूरच्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयात महिला सक्षमीकरणाशी निगडित विषयाबद्दल अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला विकास मंचाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैदेही दप्तरदार, प्रा.विद्युत जोशी, सुवर्ण पाटील, दीपाली जोशी हे उपस्थित होते. महिला सक्षमीकरणाच्या प्रगत वाटा असून महिलांना पदवीइतकेच कौशल्य शिक्षणाची आवश्यकता आहे, असे डॉ. वैदेही दप्तरदार यांनी सांगितले. आरती जोशी यांनी नर्सिग व्यवसायाची तसेच श्रीलेखा भाटकर यांनी ‘फॅशन डिझायनिंग’ आणि पूर्व ओझे यांनी ‘ट्रॅॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’बद्दल माहिती दिली. महिला सक्षमीकरणाच्या प्रगत वाटा अंतर्गत बारा व्यावसायिक क्षेत्राची ओळख करून देणारे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावण्यात येणार आहे. तसेच या निगडित वक्तृत्व, निबंध, वादविवाद स्पर्धा, महिला औद्य्ोगिक केंद्रास भेट, असे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगून मुलीनी महिला विकास मंचात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

विज्ञान प्रकल्प सादर करून अनोखी गुरुवंदना

पॉलिटेक्निक महाविद्यालयात टेक्नो गुरुपौर्णिमा

वाढत्या तंत्रज्ञानासोबत आजचे विद्यार्थी सतत काहीतरी नवीन करण्याच्या वाटेवर असतात. विद्यार्थ्यांच्या या कुतूहलतेला ओळखून ठाण्याच्या व्हीपीम पॉलिटेक्निक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांंसाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ‘टेक्नो गुरुपौर्णिमेचे’ आयोजन केले होते.

महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागाच्या अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या वापरातील अनेक गोष्टी किती सुखकर होतील या उद्देशाने ‘आरडिय़नो’ या ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट अनेक उपशाखांतील एकूण सत्तर विद्यार्थी सहभागी होते. या ‘टेक्नो गुरुपौर्णिमेचे’ हे सातवे वर्ष होते. डिजिटल सिस्टीम कंपनीचे अमोल साखळकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटच्या तृतीय वर्षांच्या समृद्धी व किरण या विद्यार्थिनींनी ‘युनी डिरेक्शन’द्वारे तयार केलेला ‘पीपल काउंटर’ हा प्रोजेक्ट केला, या मॉडेलमध्ये एखाद्या मंदिरात येणारी माणसे आपोआप मोजली जातात व संपूर्ण नोंद ही आपल्याकडे डिजिटल राहते. काही विद्यार्थ्यांनी एखाद्या बँकेत एकदी व्यक्ती जर उद्देशाने आली असेल तर  मशीन ते डिटेक्ट करून गजर वाजवते, त्यामुळे तो चोर लगेच पकडला जाऊ  शकतो. असे बँक सेक्युरिटी त्यांनी मॉडेल बनवले. द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी आदित्य साखरे या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅफिक कंट्रोलर’ मॉडेल तयार केले. तसेच तृतीय वर्षांच्या विद्यार्थिनींनी हायवे अपघात टाळण्यासाठी समोरून येणारी गाडी टाळण्यासाठी एक मशीन डिक्टेक्टर तयार केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या लॅपटॉप च्या एका बटनावरती एखादे फळ कापले जाऊ  शकते, असे एक मॉडेल तयार केले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या ७ वीमध्ये शिकणाऱ्या सोहम पवार या विद्यार्थ्यांने काही वेळा आपल्याकडून घरातील दिवे, पंखे बंद करायचे राहून जाते. काही वेळा वयोवृद्धांना उठण्यास त्रास होतो या अनुषंगाने आपल्या दूरचित्रवाणीच्या रिमोटने आपण ते चालू असेलेले दिवे पंखे बंद करू शकतो, असे एक मॉडेल तयार केले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी असे रोजच्या जीवनातील उपयोगी गोष्टीसाठी आवश्यक अशी नवीन मॉडेल्स तयार केले. आजच्या दिवसाची खरी गुरुदक्षिणा ठरते, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या इलेकट्रॉनिक्स विभागाच्या प्रमुख कीर्ती आगाशे यांनी केले.

 

महाविद्यालयीन तरुणांमध्ये ‘पोकेमॉन गो’ चे गारुड

‘‘अरे! तू कोणता पोकेमॉन पकडलास?’’

‘‘शीट यार!  माझा नेट खूप स्लो आहे, त्यामुळे बल्बसोर पकडताच येत नाहीये रे!’’

हे संवाद सध्या सगळीकडे कानावर पडत आहेत. ‘पोकेमॉन गो’ अशा भ्रमणध्वनीवरील खेळाने महाविद्यालयीन तरुणांवर मोठय़ा प्रमाणात गारुड निर्माण केले आहे. हा खेळ विद्यार्थ्यांमध्ये अल्पावधीत खूप लोकप्रिय झालेला आहे. या लोकप्रियतेमुळेच या खेळाचे सव्‍‌र्हर सध्या क्रॅश झालेले आहे. सध्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी ‘पोकेमॉन गो’ या खेळाची चर्चा करताना दिसत आहेत.

महाविद्यालयात सध्या वातावरण हे पोकेमॉनमय झालेले आहे. मित्र-मैत्रिणींच्या समूहा मध्ये त्यांची टोपणनावे पोकेमॉन या खेळाची ठेवण्यात आलेली आहे. महाविद्यालयात इतर वेळी मित्र-मित्रांमध्ये कोण सर्वात जास्त पोकेमॉन पकडतात? यावर

स्पर्धा लागलेली दिसून येते. सोशल नेट्वìकग साइट्स फेसबुक आणि व्हॉटस अ‍ॅपवर ‘‘माझा रिलेशनशीप स्टेट्स -पोकेमॉन गो’’ अशा प्रकारचे स्टेटस बघायला मिळत आहे. यावर विनोदसुद्धा केले आहेत. या संबंधित पेजेस पण फेसबुकवर बनवण्यात आलेली आहे. ट्विटरवर याच्या नावाचा हॅशटॅग बनलेला आहे.

काय आहे ‘पोकेमॉन गो’

भारतामध्ये अधिकृतरीत्या हा खेळ उपलब्ध नाही. लवकरच हा गेम भारतात उपलब्ध होईल. स्मार्ट फोन धारकांना एपीके फाईलद्वारे हा खेळ खेळता येतो. हा एका जागी बसून खेळता येत नाही. जीपीएसच्या माध्यमातून गेमचे ठिकाण आणि वेळ ठरते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरात पोकेमॉन दिसला की पकडायचा, यामुळे आपल्याजवळ पोकेमॉन असल्याचा भास होतो. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे पोकेमॉन दिसायला लागतात. पोकेमॉन दिसला की पकडायचा यामुळे अत्यंत कमी कालावधीत हा खेळ तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला आहे.

पोकेमॉन पकडण्यासाठी महाविद्यालयाच्या कॅम्पसचा फेरफटका

एका आठवडय़ापूर्वी मी हा गेम डाउनलोड केला आणि खेळायला लागलो. मला हा गेम खूपच आवडला. कॉलेजमधल्या वेळात मित्रांमध्ये ‘बल्बसोर’, ‘स्क्विर्टल’ आणि ‘चारमॅनडार’ आणि सगळ्यांचा आवडता ‘पिकाचू’ याचीच चर्चा असते. मी आणि माझे मित्र लेक्चर ऑफ असले की बाहेर जातो पोकेमॉन गो खेळतो आणि पोकेमॉन पकडायला पूर्ण कॅम्पसभर फिरतो. त्यामुळे एकप्रकारे माझा चालण्याचा व्यायामसुद्धा होतो.

– कणाद कुलकर्णी. 

(युवा वार्ताहर: मानसी जोशी, हृषिकेश मुळे)