News Flash

पाऊले चालती.. : काँक्रीटच्या जंगलातील ‘हिरवा’ दिलासा..

वसंत विहारमधील हे उद्यान अतिशय प्रशस्त आणि हिरव्या वनराईने नटले आहे.

महापालिकेने नागरिकांसाठी खुले केलेले कम्युनिटी पार्क प्रभातफेरीसाठी एक उत्तम ठिकाण आहे

कम्युनिटी पार्क, वसंत विहार, ठाणे (प)

नवीन ठाण्यात वसंत विहारजवळ सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने नागरिकांसाठी खुले केलेले कम्युनिटी पार्क प्रभातफेरीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. दिवसभर इथे नागरिकांचा राबता असतो. प्रत्येकाला हवे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उद्यानात करण्यात आला आहे.

दररोज उगविणारा सूर्य केवळ नवा दिवस घेऊन येत नाही, तर त्यातून प्रत्येक जीवाला नवी ऊर्जा, नवा उत्साह मिळतो. सकाळच्या रामप्रहरी मोकळ्या हवेत फिरल्याने केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे, तर मनही ठणठणीत राहते. सकाळीच मन प्रसन्न झाले की दिवसभर कामाला प्रेरणा मिळते. काही मंडळी फक्त चालतात, काही हलके व्यायामाचे प्रकार करतात. काही ध्यानधारणा, तर काही योगसाधना करतात. ठाण्यातील वसंत विहार येथील कम्युनिटी उद्यान हे असेच एक निसर्गरम्य ठिकाण आहे.

वसंत विहारमधील हे उद्यान अतिशय प्रशस्त आणि हिरव्या वनराईने नटले आहे. विशेष म्हणजे येथील सुरक्षाव्यवस्थाही चोख आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जाते. येथील चालण्यासाठी असलेले वर्तुळाकार ट्रॅक अर्ध्या किलोमीटरचा आहे. त्यामुळे आपण दररोज किती चाललो, याचा हिशेब नागरिकांना ठेवता येतो. उद्यानाच्या मधोमध एक छान पूल बांधण्यात आला आहे. फिरायला येणारे या पुलावर चढउतार करतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते, असे येथे प्रभातफेरीसाठी आलेल्या नागरिकांना सांगितले. ठाणे महापालिकेतर्फे चार महिन्यांपूर्वीच या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

तेव्हापासून लोक इथे नियमितपणे येत आहेत. वसंत विहारमधील नागरिकांना याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे सर्व वयोगटांतील मंडळी इथे फावल्या वेळी फेरफटका मारताना दिसतात. फेरफटका मारल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी इथे बाकडी ठेवण्यात आली आहेत. ज्यांना ध्यानधारणा अथवा योगसाधना करायची आहे, त्यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. या उद्यानात एक खुली व्यायामशाळाही (ओपन जिमखाना) आहे. थोडक्यात पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना ज्यांची गरज असते, त्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. सार्वजनिक शौचालयाचीही व्यवस्था आहे. फक्त पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे घरून पाणी आणायचे विसरल्यास नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी नियमित फिरण्यासाठी इथे येणाऱ्या नागरिकांची मागणी आहे. उद्यानात खास ध्यानधारणा आणि योगासाठी एक जागा आहे. येथे काही खुर्च्यादेखील ठेवण्यात आल्या आहेत. रोज एक ते दीड तास ध्यानधारणा करतात.

 उद्यान अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. गेले महिनाभर मी इथे नियमितपणे येत आहे. माझे वय ८२ आहे. त्यामुळे सकाळीच पाय मोकळे केले की बरे वाटते. त्यामुळे दिवसभर उत्साही आणि प्रसन्न वाटते.

– कुंदा उसर

उद्यान सुरू झाल्यापासून मी नियमितपणे येतो. इथे आल्यावर छान, प्रसन्न वाटते. सध्या धकाधकीच्या जीवनात शुद्ध हवेत श्वास घ्यायला ही उत्तम जागा आहे. खुल्या व्यायामशाळेत व्यायाम करायला मजा येते. 

– कमलाकर तासकर

उद्यान खूपच सुंदर आहे, प्रशस्त आहे. योगसाधना, दोरीच्या उडय़ा तसेच एक फेरी मारली की मनाला आनंद मिळतो. तसेच येथे झाडे असल्यामुळे स्वच्छ हवा मिळते.

– प्रिया गांगुर्डे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:49 am

Web Title: community park vasant vihar thane
Next Stories
1 वसईकरांकडून पारपंरिक खाद्यसंस्कृतीची जपणूक
2 ‘शापूरजी पालनजी’ गृहप्रकल्पाला दंडाची नोटीस
3 बदलापूरचा तरुण कानपूरमधून बेपत्ता
Just Now!
X