२० प्रभागांतील जागावाटपाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी सकारात्मक

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपची युती होणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली असताना, ठाण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र आघाडीसाठी सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी तसेच ओवळा-माजिवडा या तीन विधानसभा मतदारसंघांतील ८० जागांसंबंधी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली. आघाडीच्या चर्चेत कळीचा मुद्दा ठरणाऱ्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाची चर्चा मात्र अद्याप सुरू झालेली नाही. या मतदारसंघावरून चर्चेत स्वल्पविराम आला असून त्यावरच आघाडीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने तब्बल ५२ जागांवर विजय मिळवला होता. राज्यात सत्ता असल्याने शिवसेना-भाजपला आव्हान देत आघाडीने विजयासाठी चांगलाच जोर लावला होता. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा आहेत त्या जागा टिकविण्याचे आव्हान आघाडीच्या नेत्यांपुढे आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चेसाठी बैठकांचा धडाका लावला आहे.

गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्याच बैठकीत आघाडी करण्यावर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे एकमत झाले होते. या बैठकीपाठोपाठ गुरुवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची दुसरी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश महासचिव बाळकृष्ण पुर्णेकर, सुभाष कानडे, मनोज ओढे यांच्यासह इतर पदाधिकारी, तर राष्ट्रवादीच्या वतीने शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला उपस्थित होते. बैठकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद कोणत्या प्रभागात अधिक आहे आणि त्याठिकाणी दोन्ही पक्षांपैकी कुणाचे उमेदवार उभे करायचे यावर सविस्तर चर्चा झाली. शहरातील २० प्रभागांमधील जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. शहरातील उर्वरित जागांबाबत अद्याप चर्चा शिल्लक आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांपजे यांनी दिली.

ठाणे शहरातील २० प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांपैकी कुणाचे उमेदवार उभे करायचे यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. उर्वरित प्रभागांच्या जागावाटपाबाबत येत्या दोन दिवसांत तिसरी बैठक होणार आहे. त्यामध्ये उर्वरित प्रभागांच्या जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल.

– मनोज शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस