कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये जेवढा उत्साह दिसतो, तेवढीच उदासीनता काँग्रेस पक्षामध्ये सध्या बघायला मिळत आहे. अंबरनाथमध्ये पक्षाचे प्राबल्य वाढविण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे प्रत्येक शहरातील अस्तित्व या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. पक्षातील ज्येष्ठांनी आणि जिल्हास्तरीय मंडळींनी या दोन्ही शहरांकडे लक्ष दिले नाही. परिणामी या निवडणुकीत काही मर्यादा आल्याचे ठाणे ग्रामीणचे प्रभारी सचिव आणि निवडणूक निरीक्षक यशवंत आपटे यांनी सांगितले.
बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या ४७ प्रभागांपैकी केवळ नऊच ठिकाणी पक्षाला उमेदवार मिळाले आहेत. पक्षातर्फे ११ प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु दोन अर्ज नामंजूर झाले. यापूर्वीच्या निवडणुकीत पक्षाला उतरत्या क्रमाने यश मिळत गेले. मागच्या निवडणुकीत पक्षाची एकमेव नगरसेविका निवडून आली होती. त्यांनी शिवसेनेची वाट धरल्याने आता पालिकेत पक्षाचे अस्तित्वच नाही.
या निवडणुकीत पक्षाला शोधून-शोधून उमेदवार उभे करावे लागले आहेत; तर पक्षाचे अनेक वर्षे शहर अध्यक्षपद आणि ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्षपद भूषविलेले शंकर भोईर यांचे चिरंजीव किरण हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर गांधी टेकडी या परिसरातून निवडणूक लढवत आहेत. पक्षाच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या कार्यकर्त्यांवर ही वेळ आल्याने शहरातील कॉंग्रेसचे अस्तित्वच पणाला लागल्याचे चित्र आहे.
अंबरनाथमध्ये ३७ उमेदवारांसह पुरस्कृतही लढणार
अंबरनाथमध्ये ५७ प्रभाग आहेत. यापैकी पक्षाने ४० प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन अर्ज नामंजूर झाले. त्यामुळे ३७ प्रभागांमध्येच पक्षाचे उमेदवार आहेत. संमिश्र लोकसंख्या असल्याने अनेक भागात पक्षाचे प्राबल्य आहे. परिणामी पूर्व आणि पश्चिमेच्या काही भागात अटीतटीची लढाई होणार आहे.
..तर भोईरांवर कारवाई -आपटे
बदलापूरमध्ये शंकर भोईर हे आपल्या मुलाचा म्हणजेच भाजपचे उमेदवार करण भोईर यांचा प्रचार करताना दिसले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ठाणे ग्रामीणचे प्रभारी सचिव आणि निवडणूक निरीक्षक यशवंत आपटे यांनी स्पष्ट केले. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. एकूण किती जण अंबरनाथ पालिका निवडणुकीसाठी रिंगणात उरतात हे स्पष्ट होईल. यानंतर पक्षातर्फे सहा जणांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार आहे. बदलापूर-अंबरनाथ शहराकडे आधीच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी लक्ष दिले नाही. येथील कार्यकर्त्यांना काही उपक्रम, कार्यक्रम दिले नाहीत. त्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज पालिका निवडणुकीत काही मर्यादा आल्याचे आपटे यांनी सांगितले.
समीर पारखी, बदलापूर