प्रमुख पक्ष स्वबळावर; प्रचारात शहरातील समस्यांच्या चर्चेपेक्षा आरोप-प्रत्यारोपांवर भर

एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात गेल्या काही निवडणुकांमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट कल मिळालेला नाही. देशभरात विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची सातत्याने पीछेहाट होत असताना मुस्लीमबहुल मतदारांचे शहर अशी ओळख असणाऱ्या भिवंडीत यंदा काँग्रेसला यशाची खात्री वाटत आहे. भिवंडीतील अल्पसंख्याक मतांमध्ये फाटाफूट टळावी यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधली जावी असा मतप्रवाह सुरुवातीला काँग्रेसच्या एका गटात होता. मात्र, जागा वाटपाच्या स्पर्धेत काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, एमआयएम अशी चौरंगी लढत आता मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये रंगताना दिसत आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप भिवंडीत यंदा चांगल्या यशाची आशा बाळगून असले तरी निवडणुकीचा एकंदर रागरंग पाहता यावेळी स्पष्ट बहुमत मिळेल अशी खात्री एकाही राजकीय पक्षाला नाही.

भिवंडी महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन लढवावी अशी ठाण्यातील नेत्यांची इच्छा होती. मात्र, या दोन्ही पक्षांमधील स्थानिक नेत्यांमध्ये विस्तव जात नसल्याने युतीची शक्यता सुरुवातीच्या काही दिवसातच मावळली. काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादीने समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील होते. मात्र, काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांनी जागा वाटपाच्या चर्चेत फारच ताणून धरल्याने आघाडी तुटल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना नेते दाद देत नाहीत हे लक्षात येताच भाजपने स्थानिक नेते विलास पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. काँग्रेस पक्षात फूट पडून स्थापन झालेल्या भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट तसेच एमआयएम यांनीही काही प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. भिवंडी महापौर निवडणुकीत कोणार्क आघाडीचे नगरसेवक एरवी निर्णायक ठरतात असा अनुभव आहे. कपिल पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढताना दिसत असली तरी महापालिका हद्दीत अजूनही या पक्षाला म्हणावी त्या प्रमाणात पाळेमुळे रोवता आलेली नाहीत. त्यामुळे कोणार्क आघाडीसोबत या पक्षाने हातमिळवणी केली असली तरी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे.

परप्रांतीयांची मते निर्णायक

ठाणे जिल्ह्य़ातील संवेदनशील शहर म्हणून भिवंडीकडे पाहिले जाते. या शहरातील २३ प्रभागातील ९० जागांकरिता होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह एकूण ४६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी १६८ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. वाहतूक कोंडी, अरुंद रस्त्यांवरील उड्डाणपूल, अपुरा पाणीपुरवठा, आरोग्य समस्या, कचराभूमी समस्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा मूलभूत सुविधांची वानवा असलेल्या या शहरातील निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर रंगलेल्या अर्थकारणाची चर्चा जोरात आहे. मुस्लीमबहुल शहर म्हणून भिवंडीची ओळख असली तरी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांतील नागरिकही मोठय़ा संख्येने राहतात. त्यापैकी बहुतांश नागरिक भिवंडीतील हातमाग आणि यंत्रमाग कारखान्यांमध्ये कामे करतात. त्यामुळे या शहरात स्थानिकांपेक्षा अन्य राज्यातील नागरिकांचा आकडा मोठा असून या नागरिकांची मते निवडणुकीत निर्णायक ठरतात.

गोंधळाची परिस्थिती

भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांची युती वा आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. भाजपही स्वबळावर निवडणूक लढवीत असली तरी काही प्रभागांमध्ये मात्र त्यांनी कोणार्क विकास आघाडीसोबत युती केली आहे. महापालिकेतील आर्थिक स्थिती डबघाईला येण्यामागे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून केला जात आहे. गेल्या अडीच वर्षांत या महापालिकेत शिवसेनेचा महापौर होता. त्यास कोणार्क आघाडी आणि सर्वपक्षीयांमधील नाराजांची साथ होती. त्यामुळे सत्ताधारी म्हणजे नक्की कोण हा प्रश्न उपस्थित व्हावा इतकी गोंधळाची राजकीय परिस्थिती या शहरात आहे. महापालिकेत यापूर्वी सत्तेवर असलेल्या कोणार्क विकास आघाडीने शहराचा विकास केला नसून त्यांच्यासोबतच भाजपने हातमिळवणी केली असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेलाही एकेकाळी याच कोणार्क आघाडीच्या नेत्यांची साथ होती. या निवडणूक प्रचाराकरिता शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या रविवारी सभा होणार आहे. भिवंडी महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला भिवंडीकरांनी एकहाती सत्ता दिलेली नाही. यंदाही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळेल ही शक्यता धूसरच आहे.