महापालिकेत ठेकेदारांची मनमानी सुरूच; कर्मचाऱ्यांचे पगार थकीत

भाईंदर : वसई-विरारप्रमाणेच मीरा-भाईंदर शहरातही परिवहन ठेकेदाराने मनमानीपणा करत परिवहन सेवा बंद ठेवली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी पालिकेने दोन कोटी रुपये देऊनही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा २०१९ पासून भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण ७४ बसगाडय़ा असून यापैकी ५ गाडय़ा वातानुकूलित आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवा चालविण्याकरिता ठेकेदारास प्रति कि.मी.४२ रुपये याप्रमाणे मोबदला देत आहे. मात्र मार्च महिन्यापासून करोनाच्या साथीचे कारण देत ठेकेदाराने ठेवा बंद ठेवली. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ठेकेदाराने परिवहन सेवा सुरू करावी यासाठी पालिकेने ठेकेदाराला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र निधी मिळूनही ठेकेदाराने ९० टक्के कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाहीत आणि सेवाही सुरू केली नाही. आता तर ठेकेदाराने पुन्हा मनमानी करत पालिकेकडे अधिक रकमेची मागणी केली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून परिवहन सेवा पुन्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन चालवावी अशी मागणी केली. परंतु कर्मचाऱ्यांचा पगार हा करारनाम्यात नमूद असल्याप्रमाणे  ठेकेदारालाच देणे भाग आहे. त्याचा पालिका प्रशासनाशी संबंध नाही, अशी माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.

ठेकेदाराच्या मनमानीमुळे महापालिका हतबल झाली आहे. गेल्या वर्षी महानगरपालिका आणि भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन यांच्यात ७ वर्षांचा करार करण्यात आला होता. या करारनाम्यात पालिका कंत्रादारावर प्रत्यक्ष कारवाई करू शकणार नाही असे अटीशर्तीमध्ये नमूद केले आहे. तसेच तशी केल्यास करार रद्द केल्यानंतरदेखील कंत्रादाराला मोबदला देणे भाग पडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

परिवहन विभागावर नियंत्रण ठेवण्याकरिता परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहनसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला देण्यात आला आहे. कंत्राटदाराच्या मागणीला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसला तरी फेरविचार करण्याकरिता हा प्रस्ताव समितीपुढे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच परिवहन समितीची बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी परिवहन सभापती मंगेश पाटील यांना प्रशासनाने केली आहे.

परिवहनसंदर्भात प्रशासनाची योग्य कारवाई सुरू असून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

– अजित मुठे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका