ठाणे : कळवा येथील पौंडपाडा भागात बुधवारी रात्री चारजणांनी दोन पोलिसांना धक्काबुक्की करत बांबूने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका गुन्ह्य़ाच्या चौकशीसाठी मुंब्रा पोलिसांचे पथक कळव्यात गेले होते, त्यावेळेस हा प्रकार घडला. या प्रकरणी मोहम्मद शौकत शेख (२४), मोहम्मद इजाज शेख (२५), मोहम्मद नेहमद शेख (३०) आणि नशिमा शेख (४५) यांना अटक करण्यात आली आहे.

मुंब्रा येथील कौसा भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने मोहम्मद शौकत शेख याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शौकत याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप  तिने केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बुधवारी रात्री मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुदाम पिसे (५०), पोलीस शिपाई वाघमारे आणि त्यांचे सहकारी मोहम्मद शौकत याच्या घरी गेले होते. तिथे पोलिसांचे पथक मोहम्मद शौकत याची चौकशी करीत असताना त्याचा भाऊ मोहम्मद इजाज आणि मोहम्मद नेहमद यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोहम्मद इजाज याने शिवीगाळ करत पिसे आणि वाघमारे यांना बांबूने मारहाण केली.

या घटनेबाबत पिसे यांनी पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. त्यांच्यासोबतही मोहम्मद शौकत, मोहम्मद इजाज, मोहम्मद शेख आणि त्यांची आई नशिमा यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.