News Flash

‘करोना’चे १९ संशयित मुक्त

पथकाने आतापर्यंत १११ जणांच्या घरी जाऊन तपासणी केली असून त्यापैकी २१ संशयित रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

 

२१संशयित रुग्णांपैकी केवळ एकाला लागण, तर एकाच्या अहवालाची प्रतीक्षा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेल्या एकूण २१ संशयित रुग्णांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १९ जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ एकाच रुग्णाला करोनाची लागण झाली असून उर्वरित एकाचा वैद्यकीय तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या घरी जाऊन ठाणे जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक तपासणी करीत आहे. या पथकाने आतापर्यंत १११ जणांच्या घरी जाऊन तपासणी केली असून त्यापैकी २१ संशयित रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तसेच त्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये १९ जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले असून या सर्वाना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. केवळ एकाच व्यक्तीला करोनाची लागण झाली असून उर्वरित एका व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.

करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत नागरिकांच्या संपर्कात असलेल्या टीएमटी कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे बुधवारी वाटप महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांच्यासह पालिका पदाधिकारी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली तर वैद्यकीय तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दूरध्वनीनुसारही पडताळणी

करोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या कक्षात करोनासंदर्भात आतापर्यंत १५७ दूरध्वनी आले आहेत. त्यापैकी ५७ दूरध्वनी हे मंगळवारी दिवसभरात आले आहेत. त्यामध्ये परदेशातून प्रवास करून आलेला नागरिक, गृहसंकुलात नव्याने आलेला नागरिक, सर्दी आणि खोकला असलेले व्यक्ती अशा प्रकारचे दूरध्वनीद्वारे नागरिकांनी माहिती दिली आहे. त्यानुसार या सर्वच दूरध्वनीची शहानिशा करण्यासाठी संबंधित ठिकाणी आरोग्य पथकाने भेटी दिल्या असून सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती महापालिका प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिली.

पालिका मुख्यालयात ताप तपासणी

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ठाणे महापालिका मुख्यालयात येणाऱ्यांचा ताप तपासण्यात येणार आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासोबतच पालिकेने टीएमटी बस आणि महापालिका इमारतींसह काही सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे र्निजतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्य़ातील पब, ऑर्केस्ट्रा, डीजे बंद

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर पब, ऑर्केस्ट्रा, डीजे, लाईव्ह बँड तसेच मालिकांचे चित्रीकरण ३१ मार्चपर्यंत बंद करण्याच्या सूचना ठाणे जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:32 am

Web Title: corona 19 suspects free akp 94
Next Stories
1 पाणी दरवाढीचा प्रस्ताव लांबणीवर
2 पानटपऱ्या बंद करण्याचे आदेश
3 शिवसेनेच्या माजी आमदाराचे ‘गर्दीप्रदर्शन’
Just Now!
X