करोना केंद्रे पुन्हा सुरू; औषधांचा साठा वाढवण्यावर भर; निर्जंतुकीकरण, चाचण्यांमध्ये वाढ

ठाणे : जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यामुळे जिल्हा तसेच पालिका प्रशासकीय यंत्रणांनी पुन्हा गंभीर परिस्थितीसाठी तयार राहण्याची तयारी केली आहे. काही महिन्यांपूर्वी बंद केलेली करोना काळजी केंद्रे, अलगीकरण कक्ष पुन्हा सुरू करण्यात येत असून औषधांचा साठा ठेवणे, ताप तपासणी, चाचण्या वाढवणे, निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. याखेरीज करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी मुखपट्टीविना फिरणारे, शारीरिक अंतर न ठेवणारे, गर्दी नियमांचे उल्लंघन करणारे अशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर भागातील लोढा इमारतीमधील अलगीकरण कक्ष काही महिन्यांपूर्वी रुग्ण संख्येअभावी बंद करण्यात आला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हा कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील वाहनतळातील रुग्णालय, मुंब्रा क्रीडा संकुलातील करोना काळजी केंद्र सुरू करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. तसेच रुग्णसंख्या वाढली तर, इतरही बंद असलेली रुग्णालये आणि अलगीकरण कक्ष टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. सद्य:स्थितीत पालिकेचे एक हजार खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय सुरू असून त्याचबरोबर काही खासगी कोविड रुग्णालये सुरू आहेत.

आरोग्य केंद्रांसाठी औषधांचा आवश्यक तो साठा करणे, कोविड चाचणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा गतिमान करणे, टीएमटीच्या बसगाड्यांचा फिरते शीघ्र प्रतिजन चाचणी केंद्र म्हणून वापर करणे, रुग्ण वाढत असलेल्या भागात निर्जंतुकीकरण करणे, संशयितांची करोना चाचणी करणे, तापाची तपासणी करणे आणि शहर स्वच्छतेवर भर देणे अशा उपाययोजना पालिकेकडून केल्या जात आहेत.

अन्य शहरांतील उपाययोजना

  • कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकात शीघ्र प्रतिजन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळणाऱ्या भागात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. रुग्णसंख्येअभावी काही महिन्यांपूर्वी बंद केलेले कल्याण लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरी करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
  •  उल्हासनगर शहरात करोना नियंत्रणासाठी उभारलेली कोणतीही यंत्रणा मधल्या काळात बंद करण्यात आली नव्हती. तसेच दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी वर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शासकीय प्रसूती रुग्णालय, रेड क्रॉस, साई प्लॅटिनम या ठिकाणी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. ही यंत्रणा आजही सज्ज आहे.
  • अंबरनाथ शहरात चिखलोली भागात उभारण्यात आलेले दंत महाविद्यालयातील यंत्रणा अजूनही सुरू आहे. या ठिकाणी करोनाच्या गंभीर रुग्णांना उपचार देण्याचीही यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी दिली.
  • बदलापूर शहरात सोनिवली येथील अलगीकरण कक्ष बंद केला असला तरी गौरी सभागृहात सुरू असलेले रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू आहे. येथे ५०० खाटांची सुविधा आहे. पालिकेची प्रयोगशाळा असल्याने रुग्ण शोधणे सोपे होते आहे, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली.
  •  भिवंडी महापालिका क्षेत्रातील खुर्दाबाग करोना उपचार केंद्र सुरू आहे, तर रुग्णसंख्या कमी असल्यामुळे उर्वरित टाटा आमंत्रा, वराळदेवी मंदिर आणि रईस हायस्कूल येथील उपचार केंद्र बंद ठेवली आहेत. मात्र रुग्ण वाढले तर ही केंद्र  टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.