३७० जीवरक्षक यंत्रणा, २२० अतिदक्षता रुग्णशय्या

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गंभीर स्थितीमधील करोना रुग्णांना तात्काळ रुग्णशय्या उपलब्ध व्हावी या उद्देशातून पालिका प्रशासनाने डोंबिवली एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या विभा कंपनीची जागा करोना रुग्णालयासाठी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीअंतर्गतचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. ते मार्गी लागले आहे. हा विषय अंतिम निकाली निघेपर्यंत कंपनीची जागा काही काळासाठी करोना रुग्णालयासाठी कल्याण डोंबिवली पालिकेला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कंपनी प्रशासनाला दिले आहेत.

एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहापासून २०० मीटर अंतरावर प्रशस्त जागेत कंपनी परिसर आहे. या जागेत तीन इमारती आहेत. मानवी वस्ती आणि वर्दळीपासून दूर एकांतात हे ठिकाण असल्याने ती जागा पालिकेला करोना रुग्णालयासाठी मिळावी यासााठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली या एमआयडीसी, विभा कंपनी व्यवस्थापन आणि बँकेचे नियंत्रक यांच्याकडे प्रयत्नशील होते. कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालिकेने न्यायालयात जागेसाठी धाव घेतली होती. करोना रुग्णांची वाढती संख्या, रुग्णशय्येची वाढती गरज ओळखून न्यायालयाने कंपनी व्यवस्थापन आणि त्यावरील नियंत्रकांना काही काळासाठी कंपनीची जागा कल्याण- डोंबिवली पालिकेला रुग्णालयासाठी देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात न्यायालयाने पालिकेला जागा मिळण्याची मागणी करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी यांनी दिली.

१५ दिवसांपूर्वी पालिका हद्दीतील करोना रुग्ण संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला होता. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात करोना रुग्णालयांची गरज वाढल्याने प्रशासनाने सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कोनार्क दुकान संकुलात करोना रुग्णालय सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. कोनार्क संकुलात रुग्णालय सुरू करताना प्रशासनाला वीज, पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची तजवीज करावी लागणार होती. त्यापेक्षा विभा कंपनीची जागा मिळाली तर तयार जागा, पाणी, विजेची सुविधा असलेली प्रशस्त जागेत रुग्णालय सुरू करता येईल यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू होते. कोनार्क संकुलात रुग्णालय सुरू करत असतानाच न्यायालयाने विभा कंपनीची जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश व्यवस्थापनाला दिले.

कमी खर्चात अधिक सुविधा देऊन सुसज्ज करोना रुग्णालय उभारणीसाठी प्रशासन प्रयत्नशील होते. विभा कंपनीत इमारत, पाणी, वीज या सर्व अत्यावश्यक सुविधा आहेत. प्रशस्त जागा, एकांत, वर्दळ नाही. रुग्णांना ने-आण करण्याच्या दृष्टीने शहराजवळ अशी जागा उपलब्ध झाली. त्यामुळे विभा कंपनीच्या आवारात करोना रुग्णालय उभारणीवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. कोनार्क संकुलाचाही नंतर रुग्णसंख्येप्रमाणे विचार करता येईल. – सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता