२२ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत न केल्याचे उघड; आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना पुन्हा नोटिसा

ठाणे : करोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त देयक वसूल केल्याची बाब लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत उघड होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरातील २२ खासगी करोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ कोटी १४ लाख २८ हजार १२३ रुपयांची रक्कम परत केली नसल्याचे समोर आले आहे. अशा रुग्णालयांना आरोग्य विभागाने पुन्हा नोटिसा बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रुग्णांना पैसे दिल्यानंतरच रुग्णालयांची नोंदणी नव्याने करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा नव्हती. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची मान्यता दिली होती. यापैकी काही रुग्णालयांकडून अवाजवी देयके आकारून रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लेखापरीक्षक विभागाचे विशेष पथक नेमले होते. या पथकामार्फत रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या सर्वच देयकांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे समोर आले. या सर्वच रुग्णालयांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले होते. या स्पष्टीकरणानंतरही शहानिशा करून त्यात जास्त रक्कम वसूल केल्याचे आढळून आले तर ती जास्तीची रक्कम संबंधित रुग्णांच्या खात्यात परत करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर अनेक रुग्णालयांनी जास्तीची रक्कम रुग्णांना परत करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु शहरातील २२ खासगी करोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ कोटी १४ लाख २८ हजार १२३ रुपयांची रक्कम परत केलेली नसल्याचे समोर आले आहे.

अतिरिक्त रक्कम परत न केलेली रुग्णालये

कौशल्या रुग्णालय- १,९२,५७५ रुपये, ठाणे हेल्थ केअर- १६,३२,४४८ रुपये, टायटन रुग्णालय- ३,८८,७७५ रुपये, मेट्रोपॉल रुग्णालय- ७७,५०० रुपये, लाइफकेअर रुग्णालय- ५० रुपये, सिद्धिविनायक रुग्णालय- २९,००० रुपये, स्वस्तिक रुग्णालय- १०,३०० रुपये, एकता रुग्णालय- ४,२४,७६१ रुपये, बेथनी रुग्णालय- १४,१७८ रुपये, वेदांत रुग्णालय- १३,६५,५७८ रुपये, सफायर रुग्णालय- १,६०,९९६ रुपये, काळशेकर रुग्णालय- ७५१ रुपये, वेल्लम रुग्णालय- ५,४३,८५० रुपये, स्वयंम रुग्णालय- ४७,८५८ रुपये, अ‍ॅटलांटिस रुग्णालय- २९,५७,४०० रुपये, मॉ. वैष्णवी रुग्णालय- ३,७६,०१० रुपये, धन्वंतरी रुग्णालय- १५,६५० रुपये, हायलॅण्ड रुग्णालय- ११,५४,८२० रुपये, युनिव्हर्सल रुग्णालय- १०,१०,५४६ रुपये, विराज रुग्णालय- ४०,७०० रुपये, कैझेन रुग्णालय- ४५,५०२ रुपये, होरायझन प्राइम रुग्णालय- २,६१,३१५.