ठाणे महापालिकेत प्रस्तावावर चर्चा

लोकसत्ता, खास प्रतिनिधी

ठाणे : करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी पालिकेने गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्र  वाढविण्यावर भर दिला असून त्यापाठोपाठ नागरिकांना आता घराजवळील लसीकरण केंद्राची माहिती सहजपणे उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. या प्रस्तावानुसार पालिकेच्या डीजी ठाणे तसेच ट्विटर खात्यावर शहरातील लसीकरण केंद्राच्या ठिकाणांची लिंक देण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांना एका क्लिकवर लसीकरण केंद्र नेमके कुठे आणि किती अंतरावर आहे, याची माहिती सहज मिळणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरुवातीला शहरात १५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. या लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली होती. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने लसीकरण केंद्र वाढविण्यावर  भर दिला असून शहरात आता २५ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सर्वच लसीकरण केंद्राची यादी पालिकेने जाहीर केली असली तरी घराजवळ कोणते लसीकरण केंद्र आहे आणि नेमके कुठे आहे याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ आहेत. तसेच पालिकेकडून लसीकरण केंद्राची माहिती मिळविण्यासाठी कुठे संपर्क साधायचा आणि कुणाशी बोलायचे याबाबतही अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील नागरिकांना घराजवळील लसीकरण केंद्राची माहिती सहजपणे उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेच्या डीजी ठाणे तसेच ट्विटर खात्याच्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून देता येऊ शकते का, यावर चर्चा सुरू आहे. याबाबत महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

केंद्र असे शोधता येईल

ठाणे महापालिकेच्या २५ लसीकरण केंद्राच्या ठिकाणांची लिंक डीजी ठाणे आणि ट्विटर खात्यावर दिली जाईल. त्यातील परिसरातील लसीकरण केंद्राच्या लिंकवर नागरिकांनी क्लिक केल्यावर त्यांना गूगल मॅपद्वारे ठिकाण समजू शकेल. याशिवाय, घरापासून किती अंतरावर आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्गही समजू शकेल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

दोन खासगी केंद्रे सुरू

ठाण्यातील नऊ  खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामध्ये सिद्धिविनायक, वेदांत, ज्युपिटर, काळसेकर, प्राइम होरायझन, हायवे, पिनॅकल ऑर्थोकेअर, हायलँड आणि कौशल्य या रुग्णालयांचा समावेश आहे. यापैकी प्राइम होरायझन आणि ज्युपिटर रुग्णालयांमध्ये शुक्रवारपासून लसीकरण सुरू झाले आहे.