सहा दिवसांत ३७ हजार घरांचे सर्वेक्षण; ठाणे शहरात एक लाखाहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

ठाणे : करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने पुन्हा गृहभेटी वाढविल्या असून चाचण्या, तपासणी मोहिमेवर भर दिला आहे. रुग्णांचा तात्काळ शोध घेण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत गेल्या सहा दिवसांत ३७ हजारहून अधिक गृहभेटी देऊन एक लाखाहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त रुग्ण आढळून येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातही अशाच प्रकारे वेगळी तपासणी मोहीम राबविली जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत एकूण ३४ हजार ३७९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी २९ हजार ७९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून दररोज ५५०० च्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५ ते ६ टक्के आहे. तर आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११ टक्के आहे. ऑगस्ट महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर त्यात घसरण झाली होती. तो ६० टक्क्यांच्या आसपास आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यामध्येही सुधारणा होऊ लागली असून रुग्णदुपटीचा कालावधी आता ६९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत होते. ते गेल्या काही दिवसांत ८४ टक्क्यांपर्यंत आले होते. त्यातही आता सुधारणा होऊ लागली असून ते ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

‘सरकारी मोहिमेद्वारे काम’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंधने पाळून करोनाची महामारी नियंत्रित करण्यासाठी घोषित केलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम ठाणे शहरात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये गेल्या सहा दिवसांत ३७ हजारांहून अधिक गृहभेटी देण्यात आल्या. त्यात आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड आजार, लठ्ठपणा यांसारख्या महत्त्वाच्या अतिजोखीम गटात असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे आणि त्यांची काळजी घेणे यावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण व गरोदर मातांवर वेळीच उपचार याचा अंतर्भावही या योजनेत करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

सात टक्क्यांनी घट

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण २ लाख ८८ हजार ४९१ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११ टक्क्यांच्या आसपास आहे. ऑगस्ट महिन्यात हेच प्रमाण १८ टक्क्यांच्या आसपास होते. त्यात आता सात टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी दररोज दोन हजार चाचण्यांमध्ये चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून दररोज पाच हजारांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. त्यात तीनशेच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. यापूर्वीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी आहे.