वसई-विरारमध्ये रुग्णसंख्येत सुमारे २ हजारांनी तर मृत्यूमध्ये ७९ची घट

वसई : वसई-विरार शहरातील करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कमी होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत चालू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्या १ हजार ९००ने घट झाली आहे तर मृत्यूंच्या संख्येतही ७९ने घट झाली आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीत मागील महिन्यात १ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान २ हजार ८२६ रुग्णांची नोंद होती. चालू महिन्यात १ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत   केवळ ८४२ रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जवळपास १ हजार ९८४ रुग्णांची घट झाली आहे.

विशेष म्हणजे चालू नोव्हेंबर महिन्यात एकदाही रुग्णसंख्या १००च्यावर गेली नाही. रुग्णसंख्या ही ५०च्या आत मर्यादित राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ११४ मृत्यू झाले होते, तर नोव्हेंबरमध्ये केवळ ३५ मृत्यू झाले आहेत. म्हणजे रुग्णसंख्येत ७९ने घट झाली आहे. उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. मागील महिन्यात १ हजार ३३७ रुग्ण करोनामुक्त झाले होते, तर चालू महिन्यात ३ हजार ३६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

घरच्या घरी उपचारामुळे रुग्णसंख्या कमी

करोना विषाणू तीव्र आणि सौम्य प्रकारात असतो. बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असतात. अशी रुग्ण खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरी उपचार करत असतात. अनेक खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांनी घरच्या घरी ऑनलाइन उपचार सुरू केले आहेत. त्यासाठी ३० ते ५० हजारांचे पॅकेज देण्यात येतात. प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण घरच्या घरी १४ दिवस अलगीकरणात राहातात आणि बरे होतात. अशा रुग्णांची नोंद नसते. अनेक रुग्ण प्रतिपिंड चाचण्या (अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट) करून घेतात. त्यामुळे त्यांची नोद होत नाही.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे पालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केल्याने रुग्णसंख्या कमी झाली होती. आता राज्य शासनाची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच रुग्णांवर उपचार झाले, प्रतिबंधात्मक उपाय  झाले आणि रुग्णसंख्या घटली असे ते म्हणाले. अनेक जण आता चाचण्या करण्याऐवजी प्रतिपिंड चाचण्या करत आहेत. त्यामुळेदेखील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे ते म्हणाले. मात्र आम्ही गाफील नसून सर्वतोपरी खबरदारी घेत असून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा पुरवत असल्याचे ते म्हणाले.

चालू महिन्यात एकही मृत्यू नाही

वसई-विरारच्या ग्रामीण भागात करोना केवळ नाममात्र उरला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत ६९ने घट झाली आहे. ग्रामीण परिसरात १ ते १८ ऑक्टोबर दरम्यान एकूण ९४ रुग्ण आणि पाच मृत्यूंची नोंद होती. तर चालू महिन्यात नोव्हेंबर १८ पर्यंत केवळ २५ रुग्ण आणि एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. म्हणजे रुग्ण संख्येत ६९ने घट झाली आहे.

अठरा दिवसांत केवळ ८४२ रुग्ण

वसई-विरार महापालिका हद्दीत मागील महिन्यात १ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान २ हजार ८२६ रुग्णांची नोंद होती. चालू महिन्यात १ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत   केवळ ८४२ रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जवळपास १ हजार ९८४ रुग्णांची घट झाली आहे. विशेष म्हणजे चालू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात एकदाही रुग्णसंख्या १००च्यावर गेली नाही. रुग्ण संख्या ही ५०च्या आत मर्यादित राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ११४ मृत्यू झाले होते, तर नोव्हेंबरमध्ये केवळ ३५ मृत्यू झाले आहेत. म्हणजे रुग्णसंख्येत ७९ने घट झाली आहे.

विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. चाचण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक रुग्ण प्रतिपिंड चाचण्या करून घेत आहेत. उपाययोजनांच्या एकत्रित परिणामांमुळे रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे – गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका